मागण्यांचे निवेदन देत केली विविध विषयांवर चर्चा
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सध्या शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम सुरु आहे. शेतकरी हे अजूनही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. सध्या लगेच पैसे मिळतील असे कोणतेच पीक येऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी हा लगेच वीज बिलाचे पैसे भरू शकत नाही.
त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवावी. अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे करत राज्यपालांकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पाटील यांनी राज्यपाल यांचे बरोबर अनेक विषयावर चर्चा केली.
एम.पी.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती देणे, अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुनिश्चित धोरण ठरवून योग्य पद्धतीने प्रवेश देणे, इंजिनियरिंग व मेडिकल प्रवेश संदर्भातील पूर्व परीक्षांचे वेळापत्रक सुनिश्चित करून परीक्षा घेणे बाबत चर्चा झाली.
संपूर्ण महाराष्ट्रसह पुणे ग्रामीण व विशेष करून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सक्तीने केली जात आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने शेती पिके कोमजून चालली आहेत. विहिरी व विंधन विहिरींच्या उपलब्ध पाण्यावरती पिके जगण्याची धडपड शेतकरी करीत असताना, वीज खंडित मोहीम सुरू करून शासनाने शेतकऱ्यांना अडचणीत टाकले. मात्र लोकप्रतिनिधी हे वीज खंडित मोहिमेबद्दल गप्प बसले असल्याचा आरोप अंकिता पाटील यांनी केला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. डेल्टा प्लसचे पेशंट सापडत आहेत. काही भागात डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढत आहे. ग्रामीण भागातील गरोदर महिलांना सकस आहार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, मुलांच्या शिक्षणात अडचणी येत आहेत आदी विविध विषयांवर यावेळी अंकिता पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेशी चर्चा झाली.
या सर्व विषयात लक्ष घालू असे राज्यपालांनी नमूद केले. यावेळी अंकिता पाटील यांनी राज्यपालांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.