अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण साजरा करत असताना प्रत्येक भारतीय अभिमानाने ध्वजारोहण करुन वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करत असतो. परंतु गेली सात वर्षे रस्त्यावरील गोरगरीब नागरीकांना ध्वजाच्या मानचिन्हाने सन्मान करुन त्यांना मिठाई देण्याचा उपक्रम वानवडीतील राज्य राखीव पोलीस दलातील जवान युगराज पुजारी करत आहेत.
लहानपणापासूनच देशसेवेची आवड असणारे युगराज पुजारी यांनी शालेय जीवनात एमसीसी व एनसीसी पुर्ण करुन वयाच्या वीसाव्या वर्षी राज्य राखीव पोलीस दलात भरती झाले. भरती झाल्याच्या वर्षापासून प्रजासत्ताकदिन व स्वातंत्र्यदिन यावेळी घराबाहेर पडून रस्त्यावरील गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिक नागरीकांना ध्वजाचे मानचिन्ह देऊन मिठाई वाटप करत आहेत.
युगराज पुजारी यांच्या उपक्रमात त्यांचा भाऊ धोंडिराम पुजारी समवेत जवान दयानंद खाडे, परमेश्वर वीर, जाधव, काशीद व संदिप पाटील हे सुद्धा सहभागी झाले आहेत. या उपक्रमात कोणताही खंड न पाडता असाच सुरु ठेवण्याचा उद्देश म्हणजे जनतेच्या मनात देशभक्तीवरील प्रेम व खाकीविषयी आदर निर्माण करणे असल्याचे पुजारी यांनी सांगितले.
वानवडीतील संविधान चौक, फातिमानगर, जगताप चौक, जांभुळकर चौक, भैरोबानाला, पुलगेट अशा ठिकाणच्या गोरगरीबांना तसेच हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींमध्ये जाऊन जवानांनी स्वांतंत्र्यदिन साजरा केला.