उगवतीच्या वाटा : डॉ. महेश घोळवे, महान्यूज लाईव्ह
फार काळ लोटलेला नाही.. सात-आठ वर्षांपूर्वी तो रस्त्याच्या कडेला केळी विकायचा.. फळे विकायचा.! तो आजही ही फळे विकतोच आहे; पण या मधल्या काळात त्याचा प्रवास अधिक सुकर झाला, सुखकर झाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावरच्या जगण्याची लढाई त्याला उद्योजकाकडे घेऊन गेली. दररोज दहा डझन केळी विकण्याचे उद्दिष्ट घेऊन घरून निघणारा तो, आज वर्षाकाठी 70 टन केळी चा व्यवहार करतो.. व्यापार करतो.. विक्री करतो.. त्याची स्वतःची दोन छोटी कोल्डस्टोरेज आणि रायपनिंग चेंबर आहेत!
हि कहाणी आहे, इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील अजित प्रक्षाळे या युवकाची! अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला हा युवक कधी विक्रेता आणि कधी व्यवसायिक बनला ते त्याला देखील कळले नाही. आजूबाजूचे लोक त्यांच्या कष्टाची, जिद्दीची कहाणी सांगत राहिले आणि तो मात्र तसाच जमिनीवर पाय रोवून उभा राहिला..येणाऱ्या प्रत्येक संकटांना लढण्यासाठी आणि जिद्दीने मात करण्यासाठी!
एखादा व्यवसाय चिकाटीने, प्रामाणिकपणे व कसोटीने केला, तर तो नक्की काळाच्या तराजूवर तोलला जातो आणि त्याचे दृश्य परिणाम देखील चांगले होतात. यावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी ही कहाणी आदर्श अशीच आहे.
या कहाणीची सुरुवात होते.. भवानीनगर च्या बसस्थानकापासून! अजित प्रक्षाळे याचे वडील याठिकाणी फळे विकायचे. अजित शाळेत होता. तो शाळेच्या वेळेव्यतिरिक्त वडिलांना मदत करायचा. हळूहळू त्याला कळून चुकले की, हाच आपला प्रमुख व्यवसाय राहणार आहे आणि त्याने या व्यवसायात स्वतःला गुंतवून घेतले.
वडील परंपरागत विक्रेत्याच्या भूमिकेत राहिले. पिकलेली केळी प्रमुख विक्रेत्यांकडून घ्यायची आणि ती नंतर किरकोळ बाजारात विकायची ही त्यांची पद्धत होती. अजित हा मात्र वेगळी स्वप्ने पाहायला लागला. अनेक येणारी संकटे त्याने तोलून धरली आणि त्या संकटांचा अभ्यास करत नव्याने ती संकटे पुन्हा उद्भवणार नाहीत याची काळजी घेण्यास सुरुवात केली.
हळूहळू या व्यवसायातील गणित समजून घेतले आणि त्याने पिकलेली केळी घेऊन विकण्याचा व्यवसाय करता करता, इतर लोक ज्या प्रमाणे स्वतः कच्ची केळी विकत घेऊन पिकवतात आणि नंतर विकल्यानंतर त्यांना फार जास्त फायदा होतो याची गणित याने बांधले आणि हीच आडाखे मनात ठेवून त्याने स्वतःच्या दिशेने प्रवास सुरु केला.
मग त्याने कच्च्या केळीचा बाजार कसा असतो? त्याच्या खरेदी-विक्रीचे चढ-उतार आणि टप्पे कसे असतात? यातील बारकावे त्यांनी समजून घेतले आणि हळूहळू या व्यवसायात पाय ठेवला. मग याच परिसरात केळीच्या खूप अधिक प्रमाणात बागा आहेत. त्यामुळे कच्चामाल खूप जवळच भागात मिळू शकतो याची माहिती असल्याने त्याने कर्ज आणि नातेवाईकांच्या उसनवारी करून एक छोटेसे रायपनिंग चेंबर आणि कोल्डस्टोरेज उभे केले.
मग त्याच्या जोडीला हळूहळू त्याची क्षमता वाढली आणि दुसरी ही त्या ठिकाणी सुरू झाले. आज त्याच्या राहत्या घरात दोन खोल्यांमध्ये त्याचे हे कोल्ड स्टोअरेज आहे आणि या माध्यमातून तो या ठिकाणी डझनामध्ये नाही तर टनामध्ये केळी पिकवतो. केळीच्या हंगामात केळी, आंब्याच्या हंगामात आंबे, अशा प्रकारचा त्याचा हंगामनिहाय फळांचा व्यवसाय सुरू आहे.
स्वतःच्या बळावर आणि स्वबळावर उभे राहणे अनेकांना सोपे वाटत नसले, तरी हे वास्तव आहे. अनेकांना वाटते की, पहिल्यांदा भांडवल पाहिजे. परंतु भांडवल नसतानादेखील जर जिद्दीने ठरवलेच तर कोणत्याही व्यवसायात आपण यशस्वी होऊ शकतो हे अजितने दाखवून दिले आहे. अजित आजही भवानीनगर च्या रस्त्याच्या कडेला केळी विकतो आणि कुठेही आपण वेगळे काही केले आहे असे त्याला वाटत नाही. व्यवसायिकतेचा प्रवास असाच पुढे पुढे जात राहो आणि इतर अनेक तरुणांना त्यातून प्रेरणा मिळावी हीच या दिवसाच्या निमित्ताने सदिच्छा..!
संपर्कासाठी : अजित प्रक्षाळे, (भवानीनगर ता. इंदापूर) – 9890325845