सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
लग्न समारंभाच्या हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून विवाहितेस पतीने व चुलत मामा ने छातीवर चाकूचा वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सीमा जानसन पवार (वय 20 )असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी (दि.१३) रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील रशीद तरंगफुल काळे याचे घरासमोर घडली.
या खून प्रकरणी मयत विवाहितेचा नवरा जानसन पोपट पवार, मयतचा चुलत मामा तानाजी उर्फ योगेश नारायण पवार (दोन्ही रा.वाळुंज नवीन शिरसाईनगर ता.गंगापुर जि.औरंगाबाद) यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात भा द वी कलम 302,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मयत विवाहिता सीमा हिचे वडील रावसाहेब सिताराम काळे (रा. वाळूंज भारतनगर, तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल होताच आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना 17 ऑगस्ट 2021 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ महिन्यापूर्वी सीमाचे जानसन पवार यांच्याबरोबर लग्न झाले होते. 11 ऑगस्ट २०२१ रोजी ती आपला चुलत दीर हिम्मत योगेश पवार याच्या लग्नासाठी दोन्ही आरोपी समवेत भाटनिमगावला आली होती.
12 ऑगस्ट रोजी हळदीचे दरम्यान सीमाचे दोन्ही आरोपी बरोबर भांडण झाले होते. त्यानंतर सीमा व जानसन हे त्याच गावातील रशीद तरणफुल्या काळे यांच्या दारात झोपली होते. 13 ऑगस्ट रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जानसनने फिर्यादी रावसाहेब काळे यास सीमा हिला साप चावल्याचे फोन करून सांगितले.
त्यानंतर रावसाहेब काळे यांनी नातेवाईकांसह भाटनिमगाव ला येऊन चौकशी केली व पाहणी केली व त्यांना सीमा च्या छातीवर वार झाल्याचे दिसून आले. फिर्यादी रावसाहेब काळे यांच्या मुलीस लग्न समारंभाच्या हळदीचे कार्यक्रमामध्ये झालेल्या भांडणाचे कारणावरून फिर्यादीची मुलगी सीमा जानसन पवार (वय 20 वर्षे रा वाळुज भारतनगर ता गंगापुर जि औरंगाबाद) हीस चाकुने तिचे छातीवर वार करून तिला मयत सीमा चा नवरा जानसन पोपट पवार व चुलत मामा तानाजी उर्फ योगेश नारायण पवार यांनी तिला जीवे ठार मारल्याची फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्याद दाखल होताच फौजदार दाजी देठे यांनी सहकाऱ्यांबरोबर भाटनिमगाव मध्ये येऊन दोन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी केल्यावर मयत सीमाचा नवरा जानसन पोपट पवार व चुलत मामा तानाजी उर्फ योगेश नारायण पवार यांनी खून केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक केली.