बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यातील हिवताप निर्मूलन अभियानांतर्गत 40 टक्के व 50 टक्के फवारणी अंतर्गत जात असलेल्या आरोग्य कर्मचारी भरतीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात एकट्या इंदापूर तालुक्यातील 57 जण उत्तीर्ण झाले आहेत. खरेतर हे फार मोठे यश आहे.. नक्कीच आहे..! मात्र जर या भरतीच्या खोलात जायचे ठरवले, तर मात्र यामध्ये महाघोटाळ्याचा वास आल्याशिवाय राहणार नाही.
मार्च 2019 साली आरोग्य विभागात विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर 28 फेब्रुवारीला यासाठी लेखी परीक्षा झाली. 16 जुलै रोजी याचा निकाल लागला. दोन दिवसापूर्वी राज्याच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्हा हिवताप कार्यालयांच्या मागणीनुसार 50 टक्के फवारणी कर्मचारी संवर्गातून भरावयाच्या पदांचा निकाल जाहीर केला.
यांची एकत्रित राज्यस्तरीय गुणवत्ता यादी लावली. त्यानंतर जिल्हास्तरीय गुणतालिका प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये अनेक जिल्ह्यातील उमेदवारांचा समावेश आहे. परंतु राज्यातील या भरतीमध्ये एका तालुक्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि तो तालुका आहे, इंदापूर तालुका!
इंदापूर तालुक्याची काय खासियत आहे? असे कोणी विचारले, तर या एकाच तालुक्यातून तब्बल 57 जण अहमदनगर, सोलापूर, सातारा, पुणे या चार जिल्ह्यामध्ये उत्तीर्ण झाले आहेत. आता उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्याचा आनंद मानला पाहिजे, तर तो मानलाच पाहिजे! परंतु एकाच गावातील 27 जण उत्तीर्ण झाले आहेत याचा जास्त अत्यानंद झाला आहे.
अर्थात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच गावाच्या पाच-सहा किलोमीटरच्या परिसरातील मिळून तब्बल 36 जण यामध्ये उत्तीर्ण झाले आहेत. आणि दुसरीकडे याच परीक्षेतून याच गावातून यापूर्वी सन 2000 पासून अनेक जण भरती झालेले आहेत. त्यामुळेच हे नक्की गौडबंगाल काय आहे याकडे लक्ष वेधले की संपूर्ण भरती महाघोटाळ्याच्या कक्षेत आल्यासारखी वाटते.
हा म्हणजे तसा जागतिक विक्रम मानला पाहिजे, कारण याचा अर्थ असा आहे की, कारण या भरतीसाठी पात्र उमेदवाराने किमान तीन महिने गावांमध्ये औषधाची फवारणी केली असली पाहिजे. मग या एकाच गावात 27 जण औषध फवारणी करत होते. केवढी मोठी गावाची सेवा हे लोक करत होते असा याचा अर्थ होऊ शकतो. हा आकडा फार मोठा उच्चांकी असल्याने, हीच विक्रमी आकडेवारी सध्या सर्वांच्या नजरेत भरली आहे.
अर्थात राज्यात या परीक्षेंतर्गत उत्तीर्ण झालेले सगळेच उमेदवार चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत असा याचा बिलकुल अर्थ नाही. अनेक उमेदवार हे हंगामी फवारणी कर्मचारी यांची मुले आहेत. ती यामध्ये सरळसरळ पात्र ठरू शकतात. त्याचबरोबर खरोखरच ज्यांनी फवारणी कर्मचार्याचा सहाय्यक म्हणून काम केलेले आहे, त्यांचा देखील यामध्ये काही प्रश्न नाही. मात्र सन 2005 पासून फवारणीची कामे बंद झालेली आहेत. त्यामुळे बोगस आणि बनावट प्रमाणपत्राच्या साह्याने गावातील औषध फवारणीत सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन ज्यांनी या भरतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची चौकशी झाली पाहिजे हा याचा शुद्ध हेतू आहे.
ही भरती होत असताना किमान 90 दिवस त्या उमेदवाराने त्या परिसरामध्ये औषध फवारणी केली असली पाहिजे अशी अट यामध्ये होती. त्यासाठीचे प्रमाणपत्रही आवश्यक होते. ही प्रमाणपत्रे असणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार होते. अर्थात यामध्ये शासन निर्णयानुसार जे कर्मचारी सध्या कार्यरत आहेत, त्यांच्या मुलांना या परिक्षेत भाग घेण्यासाठी काही अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत.
कोरुना च्या काळात विविध गावांमध्ये फवारण्या झालेले आहेत मात्र या अटीनुसार संबंधितांनी खरोखरच नव्वद दिवस फवारणी केली आहे का आणि तरीदेखील फवारणी केलेले उमेदवार एका गावात 22 पेक्षा जास्त कसं असू शकतात? हा प्रश्न मात्र तितकाच लक्ष वेधून घेणारा आहे.
आणि म्हणूनच या प्रश्नाच्या खोलात गेल्यानंतर हे लक्षात आले की, पुणे जिल्ह्यात अशा प्रकारची प्रमाणपत्र देणाऱ्यांची टोळी कार्यरत आहे का? हे तपासून पाहिले पाहिजे. पाठीमागील काळातील हिवताप अधिकाऱ्यांच्या शिक्क्यांचा वापर करून ही बोगस प्रमाणपत्रे वितरित केली जात असल्याचाही संशय यामागे व्यक्त केला जात आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फवारणी करताना कर्मचारी शक्यतो महिला नसतात, हा आजवरचा प्रवाद आहे. परंतु राज्याच्या नुकत्याच झालेल्या या परीक्षेत 50 पेक्षा जास्त महिला उमेदवार देखील उत्तीर्ण झालेल्या आहेत. एवढेच नाही, तर बारामती तालुक्यातील एका गावात चक्क बहीण-भाऊ देखील या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. फक्त पुणे जिल्ह्यातच नाही तर राज्याच्या इतर भागात देखील या भरतीच्या गमतीजमतींच्या पाऊलखुणा दिसत आहेत.
अर्थात विषय केवळ प्रमाणपत्रांचा नाही, तर त्या उमेदवारांनी ज्या काळामध्ये काम केल्याची प्रमाणपत्रे सादर केलेली आहेत. त्या काळात त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी अथवा ग्रामपंचायतींनी त्यांचे वेतन काढलेले आहे का? हे तपासण्याची आवश्यकता आहे. हे तपासल्यास या महाभरतीमागील घोटाळ्याची कारणे समोर येऊ शकतील.
उस्मानाबाद जिल्हा हिवताप कार्यालयात आरोग्यसेवक म्हणून निवड यादीत नाव आल्याने बीडच्या तरुणाने अगदी पेढे वाटून आनंद साजरा केला. गावकऱ्यांनी देखील त्याचा सत्कार केला. परंतु एकाच रात्रीत या तरुणाचे नावच गायब झाले. हा प्रकार रविवारी (ता.7) उघड झाला. हे मुद्दाम झाले नसून अनावधानाने झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त करून उस्मानाबाद आरोग्य विभागाने हात झटकले. असे असले तरी, ही भरती अर्थपूर्ण व्यवहाराची असल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसते.
याचा पाठपुरावा करणार – तुषार झेंडे पाटील, उपाध्यक्ष प्रवासी महासंघ, ग्राहक पंचायत, महाराष्ट्र राज्य.
राज्यात सध्या सुरू असलेली ही हिवताप निर्मूलन कार्यक्रमांतर्गत होणारी आरोग्य सेवक कर्मचारी भरती बोगस होत असल्याचा संशय आहे. त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी त्रयस्थ पद्धतीने करावी अशी मागणी आपण करणार आहोत. ही मागणी शासनाच्या आरोग्य विभागासह राज्यपालांकडे, लोकपालाकडे तसेच ती त्रयस्थ पद्धतीने व्हावी याकरता केंद्रीय आरोग्य यंत्रणेमार्फत ही त्याच्या चौकशीची मागणी करणार आहे. आणि यातील सत्य बाहेर येईपर्यंत असा पाठपुरावा करणार आहे.
मुळात एकाच गावातील शेकडो जण एकाच खात्याच्या एकाच विभागातून भरती कसे होतात हा फार मोठा गहन प्रश्न आहे. ही भरती निष्पक्ष पद्धतीने असेल तर त्याचे स्वागतच केले जाईल आणि त्याचे समर्थनही केले जाईल. मात्र जर यामध्ये काही काळेबेरे असेल, तर नक्कीच त्याच्या मुळाशी जावे लागणार आहे असे झेंडे पाटील यांनी सांगितले.