माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. १४ – नसरापूरातील धोकादायक विजेच्या खांबाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही तत्कालीन अधिकाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केले होते. मात्र काही दिवसापूर्वीच रुजू झालेल्या महावितरण अधिकाऱ्याने याची दखल घेतली असून कर्मचाऱ्यांनी धोकादायक विजेचे खांब सरळ करून इतर दुरुस्तीच्या कामांना वेग दिला आहे. यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
नसरापूर ( ता. भोर ) येथील गावातील स्वामी समर्थ मंदिरलगत प्रवीण ठोंबरे यांच्या घराजवळ वाकलेला विजेचा खांब कधी जमीनदोस्त होईल याचा भरवसा नव्हता. याबाबत नसरापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी गेल्या सात महिन्यांपासून येथील संबधित महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.
मात्र महावितरणचे तत्कालीन अधिकारी हे आज करू, उद्या करू, लवकरच दुरुस्ती करू अशी उडवाउडवीची उत्तरे देत होते. कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्याची नुकतीच बदली झाली असून त्यांची जागी एन. एन. घाटूळे यांची नियुक्ती झाली.
धोकादायक खांब आणि तारांचा आलेला झोळ बाबत ग्रामपंचायत सदस्य नामदेव चव्हाण यांनी महावितरण अधिकारी नवनाथ घाटूळे यांच्याकडे समस्या मांडली होती. घाटूळे यांनी याची तातडीने दखल घेत नसरापूर परिसरातील वाकलेले खांब, मोडकळीस आलेल्या खांबावर तारांचा झोळ तसेच इतर विजेचे रखडलेली दुरुस्ती करण्याचे कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार स्वामी समर्थ मंदिर येथील पोल सरळ करून इतर दुरुस्तीचे कामे सुरू असल्याची माहिती महावितरण कर्मचारी समीर मुजावर यांनी दिली. तर ग्रामपंचायत सदस्य नामदेव चव्हाण, संदीप कदम, सुधीर वाल्हेकर यांच्यासह ग्रामस्थांनी वेगाने केलेल्या कामाबाबत महावितरण अधिकाऱ्यांरी नवनाथ घाटुळे तसेच वीज कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.