दौंड : महान्यूज लाईव्ह
शेतकऱ्यांच्या सातबारा आणि इतर नोंदीत चुका केल्या प्रकरणी आणि चौकशीत दोषी आढळल्याने दौंड तालुक्यातील पाटस येथील तलाठी शंकर दिवेकर यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसे आदेश दौंड- पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिले आहेत.
पाटस येथील शेतकरी प्रशांत बबन ठोंबरे आणि राहुल शामराव ढमाले यांच्या शेतजमिनीत चुकीच्या पध्दतीने नोंदी करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देवून ही नोंदी न करणे, कामकाजात हलगर्जीपणा करणे, असा ठपका ठेवत दौंड तलाठी संघाचे अध्यक्ष आणि पाटसचे तलाठी शंकर दिवेकर यांना सेवेतून निलंबित
करण्याचे आदेश दौंड – पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी 13 ऑगस्ट रोजी दिले आहेत.
शेतकरी प्रशांत ठोंबरे आणि राहुल ढमाले यांनी तलाठी शंकर दिवेकर आणि तत्कालीन मंडलधिकारी राजेंद्र मस्के यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास येत्या 15 ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा दौंड पुरंदर चे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील यांना निवेदनाद्वारे दिला होता.
त्यानुसार दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी यासंदर्भात सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार संजय पाटील यांना दिले होते.
त्यानुसार तहसीलदार संजय पाटील यांनी याबाबत चौकशी करून दौंड पुरंदर चे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला होता. तहसीलदार यांच्या चौकशी अहवालात तलाठी शंकर दिवेकर हे दोषी आढळल्याने तसा अहवाल सादर केला.
यामुळे दौंड-पुरदंचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी तलाठी दिवेकर यांना 13 ऑगस्ट 2021 रोजी सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, याबाबत तलाठी शंकर दिवेकर म्हणाले की, वरिष्ठ अधिका-यांनी चुकीच्या पध्दतीने चौकशी केली आहे. एखाद्या शेतकऱ्यांनी जर आत्मदहनाचा इशारा दिला, तर त्यांच्या दबावाला बळी पडून लगेच सेवेतून निलंबित करणे हे चुकीचे आहे. हा माझ्यावर अन्याय झालेला आहे . या विरोधात मी मॅट कोर्टात दाद मागणार आहे.