संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार तालुक्यात पावसाच्या लहरीपणामुळे गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर झाला असून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत सापडत आहे.
यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, उडीद व इतरही पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला व पीक परिस्थितीही चांगली होती. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके सुकून गेली आहेत.
पीक परिस्थिती चांगली आहे. सोयाबीन, मूग, उडीद हा बहरला असून फुलांच्या अवस्थेत आहे. याला आता पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद व इतरही पिकावर मोठ्या प्रमाणात फटका बसण्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी आसमानी संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.