इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पक्षी व माणसास इजा करणाऱ्या मांजा वापरण्यास व बाळगण्यास उच्च न्यायालयाने वेळोवेळी प्रतिबंधाबाबत निर्देश दिले असताना तसेच महाराष्ट्र शासनाने पर्यावरण विभागाने आदेश काढूनही चोरून मांजाची विक्री करणाऱ्या इंदापूरच्या बाजारपेठेतील दोन दुकानांवर इंदापूर पोलिसांनी कारवाई करत वीस हजार रुपयांचा मांजा जप्त केला.
ही कारवाई काल करण्यात आली. याप्रकरणी इंदापूर पोलीसांनी मुख्य बाजारपेठेमधील सुधीर मधुकर इंगवले यांच्या इंगवले जनरल स्टोअर्स व विशाल सुरज परदेशी यांच्या जनरल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी ठेवलेले २० हजार रुपयांच्या मांजा चे बंडल जप्त केले आहेत.
नागपंचमी सणाच्या निमित्त पतंग, वावडी साठी दोरा वापरला केला जातो. मात्र शरीरास इजा होणा-या नायलॉन पासून बनविलेल्या मांजा वापरण्यास बंदी आहे. महाराष्ट्र शासन व न्यायालयाने बंदी घालूनही काही दुकानदार हा मांजा चोरून विकत होते.
इंदापूर शहराशेजारील सरडेवाडी हद्दीतील गायकवाडवस्ती येथील दिनेश गायकवाड हे गुरूवारी 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास इंदापूरला निघाले होते.
अंबिकानगर परिसरात आले असता विक्रीस बंदी असलेला पतंगासाठी वापरण्यात येणारा मांजा त्यांच्या गळ्याला कातला गेला. अचानक गळ्याला काहीतरी आवळले गेल्याने दिनेश यांनी जोरदार ब्रेक मारले. दरम्यान ते जमीनीवर कोसळले.
पाहिले असता गळ्याभोवती काळ्या रंगाचा मांजा आवळला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर गळ्याला साधारण जखम झाल्याने दिनेश गायकवाड यांनी स्वतःला सावरत मित्र प्रवीण पवार यांकडे धाव घेतली. साधारण जखम असल्याने त्यांनी घरगुती इलाज केले. मात्र नशिब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले.
अशावेळी मांजा वापरू नये, मांजाची विक्री केली जाऊ नये अशी मागणी करत काही युवकांनी इंदापूर पोलीस स्टेशनकडे अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इंदापूर पोलिसांनी ही मांजा विक्रीसाठी ठेवू नये, बाळगू नये असे आवाहन केले होते. मात्र त्या आदेशाला धुडकावून इंदापूर शहरात चोरून मांजा विक्री होत होता.
काल चोरून मांजा विक्रीसाठी ठेवलेल्या दोन दुकानांवर कारवाई केली. याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी 10 : 30 वा. च्या सुमारास मेन पेठ इंदापूर येथे सुधीर मधुकर इंगवले (रा.इंदापूर ) याने इंगवले जनरल स्टोअर्स नावाचे दुकानांमध्ये प्लास्टिक नायलन सिन्थीटीकपासून बनवण्यात येणारे मांजा वापरास व जवळ बाळगण्यास बंदी घातलेली असताना सदर आदेशाचा भंग करून इंगवले जनरल स्टोअर्स मध्ये चोरून मांजा विक्रीसाठी ठेवलेला 9000 रुपये किंमतीचा मांजा मुद्देमालासह मिळुन आला.
याबाबत अमोल रामदास गारुडी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याच सुमारास मेन पेठ इंदापूर येथे इसम नामे विशाल सुरज परदेशी ( वय 31) इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे याने जनरल स्टोअर्स नावाचे दुकानामध्ये एकूण 11000/रुपये किंमतीचा मांजा मुद्देमालासह मिळुन आला. याबाबत विक्रम घळाप्पा जमादार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव यांनी त्याचे कडील आदेश क्रमांक सिआरटी 2015/सीआर/37 टीसी 2 दिनांक 30/3/2015 अन्वये पर्यावरण संरक्षण कायदा सन 1986 नुसार प्लास्टिक नायलन सिन्थीटीक मांजा ने पक्षी व मनुष्यास होणारे इजा ( दुखापत )पासून संरक्षण व्हावे याकरिता संबंधित मांजा जवळ बाळगळेस त्याचा वापर व विक्री करणे मनाई आदेश काढले आहेत.
उच्च न्यायालयातर्फे वेळोवेळी मांजा विक्री प्रतिबंधाबाबत निर्देश दिले आहेत. त्यामध्ये प्लास्टिक नायलॉन सिन्थेटीकपासून बनवण्यात येणारा मांजा वापरास जवळ बाळगण्यास बंदी घातलेली असताना सदर आदेशाचा भंग करून चोरून मांजा विक्री केला जात होता. यानुसार दोन्ही दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तपास पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिस करत आहेत.