दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढाकाराने मुंबई शहरातील सहकारी संस्थेच्या वतीने कोकण व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीला मदत म्हणून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ १ कोटी पन्नास लाखाचा’ धनादेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते सुपूर्त केला.
जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने निर्माण झालेली पूरपरिस्थीती आणि त्यामुळे राज्यातील अनेक भागातील गावांमध्ये डोंगरकडे ढासळून असंख्य घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. त्यात माणसे आणि जनावरे मृत्यूमुखी पडली.
हे कधीच न भरुन येणारे नुकसान झाले आहे. यातून नुकसानग्रस्त नागरीकांना नव्याने उभे करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नुकसान ग्रस्तांना आणि मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करत आहे. पण कोरोना काळात राज्यासमोरही अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या राज्याची विसकटलेली घडी बसविण्यासाठी व पूरग्रस्तांना वेळेत मदत पोहच व्हावी ही भावना लक्षात घेऊन ही मदत केली अशी माहिती मुंबई बॅंकेचे संचालक जिजाबा पवार यांनी दिली.
हा निधी संकलित करण्यासाठी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजी नलावडे यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, संचालक अभिजीत अडसूळ, विठ्ठलराव भोसले, भाऊसाहेब पार्ले, अभिषेक घोसाळकर, अनील गजरे, आनंदराव गोळे, विनोद बोरसे, जयश्री पांचाळ, शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख व कार्यकारी संचालक डी एस कदम उपस्थित होते.