आज पासून सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्याबरोबरच चार तालुक्यात लॉकडाऊन; रयत क्रांती संघटना करणार विरोध…
सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुके लाॅकडाऊन करून जिल्हा कोरोना मुक्त होईल का?
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी करण्यात अयशस्वी ठरले आहेत, असा आरोप रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुहास पाटील यांनी केला आहे.
जिल्ह्यातील माढा तालुक्याबरोबरच इतर ४ तालुक्यांमध्ये १३ ऑगस्टपासुन कडक लाॅकडाऊन सुरू होणार आहे. यामुळे जिल्हा कोरोना मुक्त होईल का असा सवाल प्रा.सुहास पाटील यांनी केला आहे. माढा तालुक्यात कोरोना रूग्ण वाढत आहेत.
माढा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींंचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, माढा तालुक्यात कोरोना रूग्ण वाढत आहेत. याला संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे. माढा तालुक्यातील व्यापारी कर्जाच्या विळख्यात सापडला असताना, परत लाॅकडाऊन झाले तर व्यापारी पूर्ण उध्वस्त होणार आहे.
टेंभूर्णी, मोडनिंब, कुर्डूवाडी व माढा ही शहरे लोकसंख्येने जास्त असून या शहरात कोरोना रूग्ण कमी आहे. ग्रामीण मध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे असे असताना संपुर्ण माढा तालुका लाॅकडाऊन करण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनींधीशी चर्चा करूनच घेतलेला आहे.
माढा तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी करण्यात लोकप्रतिनीधी, प्रशासन व आरोग्य व्यवस्था कमी पडत आहे. लसीकरणही खुप कमी प्रमाणात होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण माढा तालुका लाॅकडाऊन करण्याऐवजी जेथे कोरोना रूग्ण आहेत तो भाग किंवा गावे कंटोनमेंट जाहीर करावीत. परंतु तसे न करता संपूर्ण तालुकाच वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवला आहे. याला रयत क्रांती संघटना विरोध करणार आहे.
तालुक्यातील लहान मोठे दुकानदार, मजुर वर्ग, कामगार वर्ग यांचे मोठे नुकसान होणार आहे. गेल्या दिड वर्षाच्या सततच्या लाॅकडाऊनमुळे व्यापारी कर्जाच्या खाईत लोटला आहे. बॅंकांच्या कर्जांचे हप्ते भरणेही व्यापार्याला मुश्कील झाले आहे.
जर परत तालुक्यात लाॅकडाऊन झाले तर व्यापारी आत्महत्या केल्याशिवाय रहाणार नाहीत. तरी कोरोनाग्रस्त भागच लाॅकडाऊन करून बाकी ऊर्वरीत भाग लाॅकडाऊनच्या घोषणेतुन वगळण्यात यावेत. यासंबधी आपल्या लोकप्रतिधींनी सरकारबरोबर चर्चा करून व्यापारी वर्गाची सुटका करावी असे आवाहन रयत क्रांतीचे प्रा. सुहास पाटील यांनी केले आहे.