नगर : महान्यूज लाईव्ह
दोनच दिवसांपूर्वी नाशिकच्या माध्यमिक विभागाच्या जिल्हा शिक्षणाधिकारी महिलेवर लाचखोरीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. काल या महिला अधाकऱ्याच्या घराची झाडाझडती झाली. त्यात अनेक बॅंकांची पासबुके व चार ते पाच सदनिकांसह चारचाकी वाहन व इतर मालमत्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पडताळणीमध्ये दिसून आली. तर आज नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील वैद्यकीय शाखेच्या प्रमाणपत्रासाठी १ लाखाची लाच घेताना प्राचार्य व लिपीकाला पकडले.
या महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्थाही आता भ्रष्टाचारापासून दूर राहीलेली नाही. अर्थात जिल्हा परीषदांमध्ये जो काळाबाजार चालतो तो एव्हाना उघड गुपीत म्हणून सारेच मान्य करतात. जो सापडतो, तोच चोर या उक्तीने सारे सोपस्कार सुरू असतात. मात्र आता महाविद्यालयांपर्यंत हे जाळे पसरलेले आहे हे मात्र निश्चितच वाईट आहे.
संगमनेर येथील होमिओपॅथी महाविद्यालयाचा प्राचार्य बापूसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे (वय ५२ वर्षे, रा. मानूर ता. राहूरी) व लिपीक भारती बापूसाहेब इथापे (वय ३४ रा. निपाणी, वडगाव ता. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी एका विद्यार्थिनीला होमिओपॅथी पदवी मिळाल्याचे प्रमाणपत्र व इंटर्नशीप पूर्ण केल्याचे अनुभवाचे प्रमाणपत्र देण्यासाठी दीड लाखांची लाच मागितली होती.
त्यावरून मुलीच्या वडीलांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. एसीबीने पडताळणी केली व सापळा रचला. त्यानुसार लाच स्विकारताना दोघांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. या प्रकारामुळे मात्र संगमनेरसह राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.