बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती परिमंडलात कृषीपंपाच्या कनेक्शन धारकांकडे ६ हजार ७७५ कोटी रुपये थकबाकी असल्यावरून महावितरणने कनेक्शन तोडण्याची मोहिम सुरू केली. ही मोहिम कोणालाही पूर्वसूचना न देता सुरू केल्यावरून सुपे येथे महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या दिला.
याचा व्हिडीओ येथे पहा, अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता..
सुपे परगण्यातील वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत होत नाही, तोवर इथून उठणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, मात्र जोपर्यंत वीजपंपाचे कनेक्शन पूर्ववत जोडत नाही, तोवर इथून उठणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी कायम ठेवला.
भाजप नेते दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. अगोदरच पावसाने पाठ फिरवली आहे, त्यात कोरोनाचे महासंकट समोर असल्याने रोजगार नाहीत, शेतीकडून काही अपेक्षा असली, तरी एकीकडे भाव पाडणारे व्यापारी आणि वीज तोडणारे महावितरण त्रास देत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
महावितरणचे अधिकारी, कर्मचारी मुजोर बनले असून हप्ते देण्याची मागणी करीत असलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली. त्यामुळे आता वीज जोपर्यंत जोडली जात नाही, तोवर हे आंदोलन सुरूच राहील असे खैरे यांनी स्पष्ट केले.