सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
फेसबूकवर फेक अकाउंट काढून अनेक जणांना ब्लॅकमेल केले जात असल्याच्या घटना आपण पाहतोय. आता तर अज्ञात व्यक्तीने आपला मोर्चा वळवत पोलीस प्रशासनालाच चॅलेंज केले आहे.
खुद्द पोलीस निरीक्षकांनाच लक्ष्य करत पोलीस निरीक्षकांचेच फेक अकाउंट काढले गेले आहे. व त्यांच्या माध्यमातून तब्येत बरी नसल्याचे कारण पुढे करत पैशाची मागणी केली जात आहे.
हा पोलिस प्रशासनाला आव्हान ठरणारा धक्कादायक प्रकार इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या बाबतीत घडला आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नावानेच व त्यांच्या कुटुंबाचा फोटोचा वापर करून फेसबुकचे फेक अकाउंट काढले गेले आहे. व त्याच्या माध्यमातून माझ्या तब्येतीचा बहाणा करत पैशाची मागणी केली जात असल्याचे समजताच गोडसे यांनी पोलीस खात्याला या प्रकाराबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच आपली तब्येत चांगली आहे व मला पैशाची कसलीही गरज नाही, तसेच कोणीही कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे पाठवू नयेत, असे आवाहन करत तसा संदेश खुद्द पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसें यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवला आहे.
तसेच माझ्या नावाने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट कोणीही स्वीकारू नये व सदर अकाऊंट फेक असल्याचा रिपोर्ट मारावा तसेच इतरांनाही कळवावे असे आवाहनही पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.