बारामती : महान्यूज लाईव्ह
सन 2013 मध्ये बारामती शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन फौजदार दिपाली शिंदे आणि विशाल मेहता या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने एक लाख रुपयांची लाच घेताना पकडल्याचे कारण देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा खटला बारामती न्यायालयात चालला. यामध्ये सबळ पुराव्याअभावी दोघांचीही निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली.
बारामती सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश श्री जे. ए. शेख यांच्यासमोर हा खटला चालला. १६ जुलै २०२१ रोजी निर्दोष मुक्तता केली.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, सन 2013 मध्ये माजी नगराध्यक्ष सुनील हरिभाऊ पोटे यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती.
एका प्रकरणात फौजदार दिपाली शिंदे यांनी एक लाख रुपयांची लाख लाच मागितली होती. त्यामध्ये 75 हजार दिल्यानंतर उर्वरित पैशासाठी वारंवार मागणी केली जात असल्याने विशाल मेहता याच्यामार्फत दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. अशा आरोपावरून बारामती येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी बारामती येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु होती. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायाधीश श्री जे. ए. शेख यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेऊन दिपाली शिंदे व विशाल मेहता या दोघांचीही या खटल्यातून सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली.
या खटल्यामध्ये बचाव पक्षाच्या वतीने अॅड. सी. पी. शेणगावकर, अॅड. शामसुंदर पोटरे व अॅड. निलेश भापकर यांनी काम पाहिले.