कृषीपंपासह सर्वच थकबाकीदार महावितरणच्या रडारवर ; शेतकऱ्यांकडे ६७७५ कोटींची थकबाकी अन् ४२५ कोटींची वसूली
प्रदीप जगदाळे : महान्यूज लाईव्ह
कोरोना काळात जोखीम पत्करुन अखंडित वीजपुरवठा करुनही वीजग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल भरण्यास चालढकल केल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. परिणामी महावितरणने कृषीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना शेवटचा अल्टीमेटम देत वीजबिल भरण्याचे आवाहन केले असून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती परिमंडलातील अभियंत्यांना दिले आहेत.
बारामती परिमंडलात पुण्यातील सहा तालुके आणि सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. परिमंडलात एकूण २६ लाख ५६ हजार वीज ग्राहक आहेत. त्यातील ७ लाख ३५ हजार ५१२ हे कृषीपंपाचे आहेत. सप्टेंबर २०२० अखेर सर्व शेतकऱ्यांकडे मिळून ८१४२ कोटींची थकबाकी होती.
दरम्यान महाराष्ट्र शासनाने आणलेल्या कृषी धोरणांतर्गत २२२१ कोटी निर्लेखित करुन सुधारित थकबाकी ५९२० कोटी इतकी निश्चित झाली. कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रक्कम व सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल भरले तर उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होऊन शेतकऱ्यांना जवळपास ६६ टक्केची माफी मिळते. शिवाय भरणा झालेल्या रकमेतून ३३ टक्के गावपातळीवर व ३३ टक्के जिल्हापातळीवर विजेच्या पायाभूत कामावरच खर्च होणार आहे.
दरम्यान, एकूण शेतकरी ग्राहकांच्या तुलनेत केवळ १०.४२ टक्के (७६६८९) शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत १२५ कोटींची थेट माफी मिळवली आहे. या सर्व शेतकऱ्यांना महावितरणने थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित सुध्दा केले आहे.
तर बऱ्याच शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी अंशत: रक्कम भरली आहे अशा शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम तातडीने भरावी लागणार आहे. तसेच ज्यांनी आजवर योजनेचा लाभच घेतलेला नाही, त्यांनाही देय रक्कम भरावी लागेल, अन्यथा महावितरणला नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे.
घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडेही १३३८ कोटींची थकबाकी
बारामती परिमंडलात शेतीवगळून असलेल्या ग्राहकांमध्येही थकबाकीचे प्रमाण वाढलेले आहे. अशा विविध वर्गवारीतील ९ लाख ४२ हजार ७८३ ग्राहकांकडे १३३८ कोटी ६२ लाख रुपये थकले आहेत.
यामध्ये घरगुतीचे ८ लाख १० हजार ग्राहक असून त्यांचेकडे १८३ कोटी रुपये थकीत आहेत. साचलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विविध पथके स्थापन केली असून, सुट्टीच्या दिवशीही वसूली मोहीम सुरु राहणार असल्याने वीजबिल भरणा केंद्रेही सुरु ठेवली जाणार आहेत. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा तातडीने भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.