सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूरच्या वाळू माफियांना सळो की पळो करून सोडणारा आणि इंदापूरच्या सामान्य शेतकऱ्यांसाठी अविरत कष्टणारा सिंघम तहसीलदार पुन्हा इंदापूरच्या सेवेत दाखल होतोय!
होय श्रीकांत पाटील यांची पुन्हा इंदापूरच्या तहसीलदार पदी नियुक्ती झालेली आहे. राज्याच्या महसूल व वन विभागाने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्रीकांत कल्लाप्पा पाटील यांची इंदापूरच्या तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
इंदापूरचे तहसीलदार पद गेली चार महिने रिक्त असल्याची तक्रार ग्राहक संरक्षण परिषदेची सदस्य एडवोकेट तुषार झेंडे पाटील यांनी सरकारकडे केली होती. त्यानंतर सरकारने तातडीने जिल्ह्यासह पुणे विभागातील बदल्या 6 ऑगस्ट रोजी केल्या आहेत.
इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या प्रस्तावित बदलीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुथडी भरलेल्या नीरा नदीत स्वतः उडी घेऊन वाळूमाफियांचे कंबरडे मोडणारे श्रीकांत पाटील पुन्हा एकदा येणार, याची गेल्या दोन-तीन दिवसांपासून चर्चा सुरू होती.
या चर्चेने वाळूमाफिया अस्वस्थ झाले होते. त्यात आता थेट सरकारनेच श्रीकांत पाटील यांची तहसीलदार पदी नियुक्ती केली असल्याने, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या वाळू माफियांना देखील आता विचार करावा लागणार आहे.
अर्थात इंदापूर तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उपसामुळे बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था रूळावर आणायची असेल, तर इंदापूरच्या लोकप्रतिनिधींना देखील वाळूच्या बाबतीत कठोर पणे विचार करावा लागणार आहे. आणि त्यासाठी प्रशासनाला मुक्तहस्ते स्वातंत्र्य द्यावे लागणार आहे, आणि त्यासाठीच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे प्रभावीपणे कामगिरी करू शकतील हा विचार करूनच त्यांची येथे नियुक्ती करण्यात आलेली असावी अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्याच्या महसूल आणि वन विभागाने सहा ऑगस्ट रोजी यांनी केला असून यामध्ये भोरचे तहसीलदार अजित पाटील यांची हवेली तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर हवेलीच्या तहसीलदार राधिका बारटक्के यांची पुणे शहराच्या तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सातारा येथील तहसीलदार ताई सर्जेराव माने यांची आटपाडीच्या तहसिलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली प्रशांतसिंह मरोड यांची जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील तहसिलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तश जतचे तहसीलदार सचिन संभाजीराव पाटील यांची भोरच्या तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.











