आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली केवळ नौटंकी, लोकजनशक्ती पार्टीचा आरोप…
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड शहराच्या नगराध्यक्षा शितल कटारिया या मनमानी पद्धतीने कामकाज करीत असल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी केलेल टाळे ठोक आंदोलन केवळ आगामी नगरपरिषेदेच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून केलेले आंदोलन आहे.
हे आंदोलन केवळ नगरसेवकांची स्टंट बाजी असून नौटंकी आहे. हे आंदोलन करून ते शहरातील जनतेची दिशाभुल करीत आहेत. अशी टिका लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल चव्हाण यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे केला आहे.
दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शितल कटारिया यांच्याविरोधात विरोधक आणि सत्ताधारी नगरसेवकांनी शुक्रवारी ( दि.6 ) सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांनी नगर परिषदेला टाळे टोकून आंदोलन केले. या आंदोलनाबाबत शहरातील नागरिकांमध्ये आता उलटसुलट चर्चा सुरू आहे.
विविध राजकीय आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तीव्र प्रतिक्रीया व्यक्त करीत आहेत. लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण यांनी या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात राहुल चव्हाण यांनी नमूद केले की, दौंड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच नगरपालिकेतील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक मंडळी केवळ राजकीय हित जोपासत सोयीनुसार काम करीत आहेत आणि सोईनुसारच आंदोलन करीत आहेत.
जर नगराध्यक्ष या मनमानी पद्धतीने काम करतात, सर्वसाधारण सभा होत नाही, असे या नगरसेवकांचे म्हणणे असेल, तर मग या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणावा. अथवा सर्व नगरसेवकांनी सामुहिक राजीनामे द्यावेत.
जर खरंच या नगरसेवकांना शहरातील विकास कामांविषयी तळमळ असेल तर त्यांनी संविधानिक अधिकाराचा वापर करून प्रश्न सोडवावा, नगरपरिषदेला टाळे ठोकून सर्व सामान्य नागरिकांना आणि नगर परिषदेतील कर्मचारांना वेठीस धरू नये, नगरसेवकांनी शहरातील नागरिकांची दिशाभुल करणे थांबावे अशी टिका राहुल चव्हाण यांनी प्रसिध्द पत्रकात केली आहे.