राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे बेकायदा गावठी दारू (हातभट्टी ) अड्ड्यावर पाटस पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत दारूचे साहित्य पोलीसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर दौंड पोलीसांनी कुरकुंभ येथील मटका अड्ड्यावर धाड टाकून मुद्देमालासह मटका चालकास ताब्यात घेतले आहे.
मागील काही दिवसांपासून कुरकुंभ येथे एका हॅाटेलच्या पाठीमागे खुलेआम मटका व्यवसाय तेजीत सुरू होता. याबाबत दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना माहिती मिळताच पोलीस एक पथक कारवाईसाठी तैनात केले.
या पथकाने कुरकुंभ हद्दीत पुणे- सोलापूर हायवे रोडचे सोलापूर बाजूचे सर्व्हिस रोडलगत मोरे यांच्या हाॅटलेच्या पाठीमागे आडोशाला खुलेआम मटक्याचा व्यवसाय सुरू असल्याचे पाहिले.
पोलीसांनी बेकायदा बिगर परवाना कल्याण मटका नावाने जुगारीची साधने व रोख रक्कम असा एकुण 1 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अशोक सर्जेराव चव्हाण (वय 53 रा.भिमनगर दौंड ता.दौंड जि.पुणे), अकबर शेख (रा. नटराज काॅलनी दौंड ता.दौंड जि.पुणे ) या मटका चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
यापैकी अशोक चव्हाण याला पोलीसांनी अटक केले आहे, तर अकबर शेख हा पोलीसांना पाहून तेथून पळून गेला आहे. याबाबत पोलीस शिपाई रविंद्र काळे यांनी फिर्याद दिल्याने या दोघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा व्यवसाय करताना आढळल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशी कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
पाटस येथील डोंगरेश्वरनगर येथे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, बाळासाहेब पानसरे, पोलीस नाईक सुधीर काळे,दत्तात्रय टकले, समीर भालेराव, घनश्याम चव्हाण, पोलीस मित्र सोनबा देशमुख आदींनी गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला असता घरांमध्ये गावठी दारूची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
पोलीसांनी गावठी (हातभट्टी ) दारूचे साहित्य, दारू असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सुनिल सुरेश पोळ आणि दिपक पोपट जाधव दोघे (रा. पाटस डोंगरेश्वरनगर, ता.दौंड.जि.पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली.











