सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या राज्यपालांच्या भेटीला यश
‘एमपीएससी’ च्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीची अधिसूचना जारी
मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यपालांचे राज्य सरकार समवेत संबंध ताणले असतानाच एमपीएससीच्या प्रश्नावरून सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे राज्यपालांना काल भेटण्यासाठी गेले होते. आयोगावरील रिक्त पदावरील तीन सदस्यांची तातडीने नियुक्ती करण्यासाठी राज्य शासनाने पाठविलेल्या प्रस्तावावर राज्यपालांची स्वाक्षरी असणे महत्वाचे होते. राज्यपालांनी तीन दिवस त्यावर स्वाक्षरी केली नव्हती. मात्र भरणे त्यांना भेटून आल्यानंतर दोन तासातच राज्यपालांनी या अध्यादेशावर सही केली आणि एमपीएससीच्या रिक्त जागांचा प्रश्न मार्गी लागला.
राजपाल भगतसिंह कोश्यारी यांची भरणे यांनी घेतलेली भेट यशस्वी झाली असून कोश्यारी यांनी तीन सदस्यांच्या निवडणुकीच्या अधिसूचना आज जारी केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव जाधव या तीन सदस्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत
भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक पदाच्या 496, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या 1145, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा परीक्षा 435, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 100 पदे, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा 16 पदे, अशा एकूण 2192 पदांसाठी सहा हजार 998 उमेदवार मुलाखतीकरिता पात्र झाले आहेत.
त्यापैकी 377 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून, उर्वरित सहा हजार 621 उमेदवारांच्या मुलाखती अद्याप बाकी आहेत. आता या सदस्य नियुक्तीमुळे या भरती प्रक्रियेला वेग येईल.
श्री. भरणे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या वाढवण्याच्या अनुषंगानेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्यासमवेत या कालच्या बैठकीत चर्चा झाली आहे. आयोगाच्या एक सदस्यांचा कार्यकाल लवकरच पूर्ण होत असून त्यांची रिक्त होणारी जागा भरण्यासाठीही लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे राज्यपालांना सांगितले. हे दोन्ही प्रस्ताव प्राप्त झाल्यावर त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही राज्यपाल म्हणाल्याचे श्री. भरणे यांनी सांगितले.