सातारा : महान्यूज लाईव्ह
भारतीय सेनादलाचा खेळाडू व सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे गावचा प्रवीण रमेश जाधव यांच्या कुटुंबियांना घर पाडण्याची धमकी सातत्याने दिले जात असल्यामुळे हे कुटुंब वैतागून प्रवीणच्या आजोळी म्हणजे दौंड तालुक्यातील जळगाव येथे स्थायिक होण्याच्या विचारात आहे. त्यांचे घर शेती महामंडळाने वाटप केलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या मालकीच्या जागेत येत असल्याचा या संदर्भातील वाद यामागे असल्याचे सांगितले जाते.
चार गुंठे जागेवरून प्रवीणच्या जागेचा वाद सुरू असून प्रांताधिकार्यांनी घर बांधायला परवानगी दिली, तरी घर पाडण्याची सातत्याने धमकी मिळत असल्याने प्रवीणचे कुटुंब या धमक्यांना वैतागले आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी या प्रकाराला वैतागून प्रवीणचे आजोळ असलेल्या जिरेगाव या दौंड तालुक्यातील गावात स्थायिक होण्याचा विचार चालवला आहे. यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यामध्ये मध्यस्थी करून दोन कुटुंबांमध्ये चर्चेचा देखील प्रयत्न चालवला आहे. येत्या दोन दिवसात हा प्रश्न मिटेल असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेती महामंडळात प्रवीणचे वडील रमेश जाधव हे कामाला असल्यामुळे शेती महामंडळाने त्यांना घर बांधायला जागा दिली आहे. फलटणच्या प्रांताधिकार्यांनी घर बांधण्यासाठी जागा मोजून दिली, मात्र शेजारचे कुटुंब शेती महामंडळाने दिलेली जागा आमचीच आहे असे सांगून बांधकामात अडथळा आणत असल्याच्या कारणावरून हे कुटुंब आता दौंड तालुक्यातील जिरे गावात स्थायिक होण्याच्या विचारात आहे.
प्रवीण जाधव हा सेना दलात जवान असून तो सध्या नुकत्याच झालेल्या जपानमधील टोकियो येथील ऑलिंपिकमध्ये भारताकडून तिरंदाजी या प्रकारातील प्रतिनिधित्व करणारा खेळाडू होता. पहिल्या सेटमध्ये त्याने जागतिक द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूला हरवल्यानंतर, जागतिक विजेत्या खेळाडूने त्याचा पराभव केला.
मात्र त्याच्या तिरंदाजीने भारत सरकार मधील तज्ञ मंडळी देखील भारावून गेली. त्या प्रवीण जाधवना घराच्या जागेचा अडथळा येत असल्याने शासनाने यात लक्ष घालावे अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
जर खरोखरच शेतकऱ्याला दिलेल्या जमिनीत हे अतिक्रमण होणार असेल तर प्रशासनाने विचार करावा!
दरम्यान शेती महामंडळात खंडकरी म्हणून ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांनी जवळपास 40 ते 45 वर्षांचा विलंब आवधी सोसलेला आहे. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याची जमीन मोजून दिली असेल आणि त्याच शेतात शासकीय अधिकाऱ्यांनी जागा मोजून दिली असेल, तर तेही सर्वथा चुकीचे आहे.
यासंदर्भात एखाद्या शेतकऱ्याच्या जागेतही अतिक्रमण होणार नाही याची काळजी देखील प्रशासनाने घेतली पाहिजे. जरी राष्ट्रीय खेळाडू कोणी असेल, तो जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अतिक्रमण करणार असेल, तर तेसुद्धा चुकीचे होईल. त्यामुळे प्रशासनाने योग्य विचार करून निर्विवाद असलेली व वादग्रस्त नसलेली जागा प्रवीणच्या कुटुंबाला मोजून दिली पाहिजे असे मत गावातील काही नागरिकांनी व्यक्त केले.
शेती महामंडळातील कामगारांनी देखील शेती महामंडळासाठी फार मोठे योगदान दिले आहे. परंतु शेवटच्या कालावधीत सरकारने देखील या महामंडळातील कामगारांना वाऱ्यावर सोडले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काची राहण्यासाठी जागा मिळालीच पाहिजे, याविषयी कोणतेही दुमत नसल्याचे मत देखील गावकऱ्यांनी व्यक्त केले.











