रस्ता दिलेल्या शेतकऱ्यांचा कर्जत पोलिसांनी केला सत्कार
अॅड. विजय सोनवणे, महान्यूज लाईव्ह
कर्जत – कर्जतचे पोलिस कधी टायरमधील फसवणूक शोधून देतात.. कधी एखाद्यावर खोटी तक्रार झाली असेल, तर त्याचीही शहानिशा करतात.. खासगी सावकारीवरही उपाय शोधतात.. मग तालुक्यातील लोकांना आपले सारेच प्रश्न पोलिस सोडवतील असा विश्वास वाटू लागला तर त्यात नवल ते काय?…खरोखरच कायदा व सुव्यवस्था या शब्दांमध्ये जे-जे घटक येतात, ते प्रत्येक सोडवण्याचे काम पोलिस करू शकतात.. मात्र … जाऊ द्या, तालुक्यातील बहिरोबावाडी येथील बहिरोबावाडी ते शेळकेवस्ती हा कच्चा रस्ता दोन वर्षापासून बंद होता, तो पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्थीनंतर खुला झालाय…हेच कायदा व सुव्यवस्थेचे खरे यश आहे..! (The unpaved road from Bahirobawadi to Shelkevasti karjat, in Bahirobawadi was closed for two years and was reopened after the intervention of police inspector chandrashekhar yadav)
बहिरोबावाडी ते शेळकेवाडी मार्गे गायकरवाडी फाटा येथे जाणारा कच्चा रस्ता जमिनीच्या वादामुळे तब्बल अडीच वर्षापासुन बंद होता. वादात अडकलेल्या या रस्त्यामुळे लोकांना खूप मोठी कसरत करावी लागत होती. या रस्त्यामुळे २०० ते २५० नागरिक व विद्यार्थ्यांना बहिरोबावाडीत ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने संपर्क तुटला होता.
रस्त्याबाबत दोन्ही गटात सतत वाद होऊन कर्जत पोलीस ठाण्यात तक्रारी येऊ लागल्या. रस्ता बंद असल्याने व त्यातून सतत वाद होत असल्याने भविष्यात या वादातून आणखी मोठे गुन्हे घडू शकतात याची कल्पना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना आली आणि त्यांनी यामध्ये कायद्याचा दांडू उपयोगाचा नाही, त्याऐवजी मने बदलण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग करण्याचे ठरवले.
त्यांनी रस्ता बंद असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्यांच्या जमीनी आहेत, त्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद वाढवला. रस्त्याची आवश्यकता असलेल्या सर्व शेतक-यांच्या व या रस्त्यासाठी जमीन देणा-या शेतमालकांच्या बैठकी घेऊन यशस्वी मध्यस्थी केली.
कोणताही वाद न होऊ देता सामंजस्याने हा वाद मिटला. यादव यांच्या शब्दाला दोन्ही बाजूच्या शेतकरी व रहिवाशांनी मान दिला. दोघांना समजून सांगण्याची यादव यांच्या बुध्दीकौशल्याचीही तत्परता येथे कामी आली. त्यांच्या मध्यस्थीने वर्षानुवर्षे बंद पडलेला रस्ता अखेर खुला झाला.
यादव यांच्या शब्दाखातर या रस्त्यासाठी कैलास दगडू यादव, विठ्ठल साहेबराव यादव, दिलीप महादेव यादव, वसंत भास्कर यादव (सर्व रा. बहिरोबावाडी) यांनी त्यांच्या जमीनीतून रस्ता दिला. त्यांच्या या मोठेपणाचे कौतुक करत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्यांचा सत्कार केला.
रस्त्यासाठी असलेला हा संघर्ष आता थांबला आणि शेतकरी, शाळकरी मुलांचा मार्ग मोकळा झाला, म्हणून बहिरोबावाडीतील ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान केला व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
बंद पडलेला हा रस्ता खुला करण्यासाठी पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह कर्जत पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार सलीम शेख, मनोज लातुरकर, अमित बरडे यांचेसह बहिरोबावाडी गावचे ग्रामस्थ दिपक यादव, वसंत यादव, अनिल यादव, कैलास यादव, सुधिर यादव, राजु यादव, ज्ञानेश्वर यादव, सतिश शेळके, झुंबर शेळके आदींनीही विशेष परीश्रम घेतले.











