अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
रिक्षाचालक किती प्रामाणिक असतात, त्याचे दाखले वेळोवेळी मिळतातच, मात्र रिक्षात नव्हे तर रस्त्यात पडलेली पर्स रिक्षाचालकाला मिळाल्यानंतर संबंधित महिला प्रवाशास ती पर्स पुण्यातील महमंद शेख यांनी प्रामाणिकपणे सूपूर्त केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
हांडेवाडी रस्त्यावरील गुलामअलीनगर येथे राहत असलेले मंहमद शेख हे व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. त्यांना शुक्रवारी (ता. ३०) रात्री हेवन पार्क ते कृष्णानगर रस्त्यावर एक पर्स रस्त्यावर पडलेली दिसली. कोणाची तरी ती चूकुन पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.
ही पर्स उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये सोन्याचे दागिने, डेबिट कार्ड, रोख रक्कम व मोबाईल असा एक लाखापेक्षा अधिक ऐवज होता. शेख यांनी याची माहिती वानवडीतील रवींद्र जांभुळकर यांना दिली. त्यानंतर या पर्समधील मोबाईल सुरू केला. हा मोबाईल या पर्सच्या मालकाचाच असणार असल्याने त्यावर फोन आल्यास पुढील तजवीज करण्याचे त्यांनी ठरवले.
त्यानुसार श्रध्दा तिवारी यांचा फोन या मोबाईलवर आला. शेख यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा ही पर्स सापडल्याचे सांगितले. या संपर्कानंतर तिवारी यांना वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवनासमोर बोलावून घेतले व शनिवारी सकाळी सापडलेली पर्स, सर्व ऐवजांसह सर्वांच्या साक्षीने श्रद्धा तिवारी यांना सुपूर्द केली.
ऐवजांसह पर्स मिळाल्यानंतर तिवारी यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मला आपण भावसारखे आहात असे सांगून आपल्या सारख्यांमुळेच मानवता टिकून असल्याची भावना श्रद्धा तिवारी यांनी व्यक्त केली. यावेळी वानवडीतील रवींद्र जांभूळकर, दिनेश होले इतर सहकारी उपस्थित होते.











