दौंड : महान्यूज लाईव्ह
शहरातील गजबजलेल्या गोपाळवाडी रोड परिसरात दुचाकीवर घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी धुम स्टाईल ने चोरून चोर पसार झाले, मात्र हे चोरटे सीसीटिव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दौंड पोलीस सीसीटिव्ही फुटेजच्या आधारावर या चोरट्याचा शोध घेत आहेत. शनिवारी ( दि. 31) दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
संजना विजय नानावानी (रा. कुंभार गल्ली, दौंड) या दुचाकीवरून आपल्या पतीसोबत गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथून कुंभार गल्ली येथील आपल्या घरी जात होत्या, तेव्हा त्यांच्या पाठीमागून दोन अज्ञात इसम काळ्या रंगाच्या दुचाकीवरून येत होते.
नानावाणी दांपत्याच्या दुचाकीचा वेग कमी झाल्याचे पाहून या दुचाकीवरील अज्ञान चोरट्यांनी गळ्यातील 75 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावली व धूम स्टाईलने शहरातील शालीमार चौकाच्या दिशेने पळून गेले. दरम्यान हा प्रकार त्याठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही फुटेज मध्ये कैद झाला.
याबाबत संजना नानावामी यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने अज्ञात चोरांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली व परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. या अज्ञात चोरांविषयी माहिती मिळाल्यास त्वरीत दौंड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन दौंड पोलिस निरीक्षक पवार यांनी केले आहे.











