सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : बंद केला, बंद केला, म्हणता म्हणता वाळूउपसा पुन्हा सुरू झाला.. महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाळू उपसा करणारे माफिया रात्रीच्या वेळी वाळू उपसा करू लागले. आज इंदापूर पोलिसांनी दोन बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उडवल्या.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता.
इंदापूर तालुक्यात उजनीच्या काठालगत पुन्हा एकदा वाळू उपसा जोरात सुरू झाला आहे. आज महसूल व पोलिसांनी जोरदार संयुक्त मोहीम राबवत दोन बोटी उडवल्या. यात वाळू माफियांचे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. इंदापूरचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी ही माहिती दिली.
या कारवाईमध्ये इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहायक निरीक्षक महेश माने, पोलीस शिपाई अमोल गारुडी, समाधान केसकर, राजू नवले, अर्जुन भालसिंग, पोलीस पाटील राजेंद्र शिंदे, अरुण कांबळे, संजय राऊत आणि महसूल विभागाच्या तलाठ्यांनी सहभाग घेतला.
या कारवाईत ज्यांच्या बोटी स्फोटाने उडवल्या आहेत, अशा माळू माफियांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गोडसे यांनी दिली.
अशा कारवाईत खरोखरच वाळू माफियांचे नुकसान होते का?
इंदापूर पोलिसांची आणि महसूल खात्याची ही कारवाई अत्यंत कौतुकास्पद आहेच, यात काही दुमत नाही. परंतु वाळू माफिया या कारवाईच्याही पुढे दोन पावले आहेत असाच प्रत्यय वेळोवेळी येताना दिसतो. ज्या ज्या वेळी प्रशासनाने सुरुंगाच्या स्फोटात बोटी उडवल्या आहेत. त्या बोटींचे पुढे काय झाले? याची माहिती घेतली असता वेगळेच वास्तव समोर आले.
बऱ्याचदा अशा बोटी ज्या ठिकाणी त्यांचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानग्रस्त बोटी पुन्हा वाहनांमध्ये भरून काही विशिष्ट ठिकाणी नेल्या जातात. त्या ठिकाणी या बोटी दुरुस्त करण्याची कामे केली जातात आणि काही कालावधीनंतर पुन्हा या बोटी या भागात दिसू लागतात. त्यामुळे पोलिसांनी अशा बोटी दुरुस्त करणारी ठिकाणीदेखील निवडावीत व एकूणच या नंतरच्या काळात कारवाई केली, त्यानंतर पुढे काय झाले याचा तपास करण्याची आवश्यकता आहे.











