अॅड. विजय सोनवणे: महान्यूज लाईव्ह
नगर : कर्जत तालुक्यातील तरुणाच्या बायकोला सासऱ्याने साताऱ्याला नेले. सासरा बायकोला काही पाठवत नसल्याने नाईलाज झालेला ‘तो’ रात्रीच्या दहा वाजता कर्जत पोलिस ठाण्यात आला. गळ्याला ब्लेड लावले आणि माझी बायको आताच्या आत्ता आणून द्या, नाहीतर गळा कापून घेतो असे म्हणू लागला. पोलीसही चक्रावून गेले.. एक वेगळाच प्रकार पोलीस पाहत होते. गुन्हेगाराने पोलिसांना ब्लॅकमेल करण्याचा हा पहिलाच प्रकार, पोलिसांनी अगोदर शांतपणे ऐकून घेतला. त्याला समजावले. पण त्याची रीत काही नीट वाटत नसल्याने, मग पोलिसांनी त्याला लॉकअपमध्ये टाकले..!
कर्जत तालुक्यातील शिंदा गावातील रोहित दिपक काळे असं या कहाणीतल्या तरुणाचे नाव. सासरा पितांबर यांनी सातारा येथे नेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी चक्क हातात ब्लेड घेऊन त्याने कर्जत पोलीस स्टेशन गाठले. बायको लगेच आणून द्या, नाहीतर गळा कापून आत्महत्या करेल अशी धमकी तो चक्क पोलिसांना देऊ लागला.
हे घडत असताना त्याच्याबरोबर असलेला चुलत भाऊ सोमनाथ हा या घटनेचे व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ठाणे अंमलदार प्रबोध हंचे यांनी रोहित याच्या सासऱ्याच्या फोनवर कॉल केला व फोनकॉलवर वेळ घालवला. पोलीस तरूणाला समजावत होते, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मात्र त्याच वेळेस या संपूर्ण घटनेची चित्रीकरण त्याचा चुलत भाऊ करत असल्याने पोलिसांनी ही घटना अधिक गांभीर्याने घेतली.
पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, बळीराम काकडे यांनी तात्काळ झडप घालून रोहित दिपक काळे याचे दोन्ही हात पकडून त्याच्यावर नियंत्रण मिळवत हातातील ब्लेड काढून घेतले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक निरीक्षक सुरेश माने यांनी त्याला ताब्यात घेऊन खात्री करून त्याची वैद्यकीय तपासणी केली.
रोहित काळे याच्यावर स्वतःला जखमा करून घेणे तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणे; तर त्याचा चुलत भाऊ सोमनाथ काळे याच्यावर आत्महत्येसाठी चिथावणी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक : बेकायदेशीर कृत्य करून अनेकवेळा प्रशासनाला विनाकारण वेठीस धरण्यासाठी प्रयत्न करतात.आपली समस्या शांतपणे मांडा. पोलिस प्रत्येक अडचणीतून मार्ग काढतील. प्रश्न सोडवण्यासाठी बेकायदेशीर बाबींचा कुणीही विचार करू नये. एक अडचण सोडवताना आणखी अडचणी निर्माण होतात.











