बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपी जयदीप तावरे काल जामिनावर सुटून आल्यानंतर माळेगाव बारामती रस्त्यावर दारुगोळ्याची आतिषबाजी झाली. पोलिसांच्या समोर सुरू असलेली ही दारुगोळ्याची आतषबाजी माळेगावचे जणू भविष्य सांगणारी ठरली.
जयदीप तावरे यांना अटक झाल्यानंतर माळेगावकर उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आले. त्यावेळी रविराज तावरे यांच्याविषयी असलेली सहानभूती जयदीप आणि इतरांच्या नावाचा रविराज यांनी जबाबात समावेश केल्याने संपली, असे जे लोक सांगत होते, ते लोक कालच्या देखील घटनेचे साक्षीदार होते.
काल संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास माळेगावातील चौकात जे दृश्य निर्माण झाले होते, ते देखील अशाच प्रकारे निर्माण झालेली सहानुभूती लोकांच्या मनातून उतरवणारे होते. पोलिसांची गाडी शेजारी उभी होती आणि त्याच्या समोरच फटाक्यांचे बार फुटत होते दिवसा उडत असलेले हे तोफांचे बार समर्थकांच्या दृष्टीने चैतन्यदायी असले तरी कायद्याच्या दृष्टीने मात्र दिवसा चांदण्या चमकणारे होते.
एखाद्या गुन्ह्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या निकालापूर्वीच जामीनावर सुटून आल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करणे हे देखील राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्याच्या दृष्टीने चांगले चित्र नाही, त्यामुळे माळेगाव जेव्हा नगरपंचायत होईल तेव्हा काय होईल? याची एक चुणूक या निमित्ताने दिसू लागली आहे.
माळेगाव मधील राजकारण किती खालच्या थराला गेले आहे हेच या दोन प्रकरणावरून दिसून येते. अर्थात सामान्य माणूस म्हणून एखादा व्यक्ती या घटनेकडे पाहत असताना काय विचार करत असेल याचे मात्र कोणालाच देणेघेणे नाही.











