शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर लोकसभा मतदार संघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा कळीचा मुद्दा असला तरी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर व केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या धडाकेबाज निर्णयानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे भाग्य उजळणार आहे. कारण केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या पुढाकारातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने 67 किलोमीटर लांबीच्या 7 हजार कोटी रुपयांच्या एलिव्हेटेड कॉरीडॉर रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार एड. अशोक पवार यांच्याशी चर्चा करत अठरा पदरी रस्त्याचा या कामाच्या पर्यायावर शिक्कामोर्तब केले होते.
या कामास केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. येणाऱ्या काळात दुमजली पुलासह होणारा हा अठरा पदरी रस्ता शिरूर तालुक्याचे भाग्य उजळवणारा ठरेल असे बोलले जात आहे. त्याचबरोबर शिरूर तालुक्यात महामार्गावर होणारी कोंडी देखील दूर होण्यास मदत होणार असून, पुणे शिरूर रस्त्याची वाहतूक कोंडी आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीचा या संदर्भातील प्रश्न दळणवळणाच्या दृष्टीने कायमचा मार्गी लागेल अशी चिन्हे आहेत.