बारामती : महान्यूज लाईव्ह
स्थळ : पिंपळी (ता. बारामती) – युबी ग्रुपच्या कंपनीसमोरचा चौक.. रस्त्यावरच कार लावून मद्यपी त्यातून उतरतात. गाडी आडवी लावल्याने बाकीचे तेथून बाजूला निघू लागले की, अडवून गाडी धरायची आणि त्याला कानफटात मारायचे.. आता रस्ता बंद.. ह्यो रस्ता आमचाच.. आम्ही इथले शेठ.. आमचा नादच लई थेट असे म्हणत बेवड्यांनी रस्त्यावर तमाशा केला. सलग दोन दिवस आठ ते दहा जणांना मारहाण केल्यानंतर काही जणांनी थेट बारामती शहर पोलिस ठाणे गाठले..!
बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या पिंपळी गावाच्या चौकात आज संध्याकाळी झालेला हा तमाशा बारामतीपासून निघालेल्या बाहेरच्या जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनाही विस्मयाकित करून गेला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास चारचाकी गाडी आडवी लावून एक सरपंचाचा भाऊ गाडीतून उतरला, त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा आपलाच रस्ता, आतापासून बंद.. म्हणजे बंद! असे म्हणत येणाऱ्या- जाणाऱ्यांना अडवायला सुरवात केली.
सुरवातीला दारुडे आहेत, म्हणून काही जणांनी दुर्लक्ष केले. मात्र ते प्रत्येकालाच मारू लागले. त्यामुळे काही जणांनी थेट शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या दरम्यान हा तमाशा करणारा एक सरपंचाचा भाऊ असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र पोलिस ठाण्यात कोणीतरी तक्रार देत आहे म्हटल्यावर लागलीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी फिल्डींग देखील लावली. हे प्रकरण मिटविण्यासाठी मग कोणीतरी सरपंचाचा भाऊ देखील पोचला.
पण प्रकरण पोलिसांच्या लक्षात आले, तेव्हा यांना असेच सोडणे बरोबर नाही, हे लक्षात घेत बारामती शहर पोलिसांनी त्यांना देखील तुम्ही शेठ असला, तरी आम्हीच ग्रेट आहोत याची चुणूक दाखवून दिली. दरम्यान शहर पोलिस ठाण्याचे फौजदार श्री जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती दिली.