दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील कोंढावळे येथील देवरूखवाडी येथील भूस्खलनातील मृतांच्या नातेवाईकांना आज लगेचच आमदार मकरंद पाटील यांनी प्रत्येकी चार लाखांच्या मदतीचे धनादेश सूपूर्त केले.
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात कोंढावळे गावच्या हद्दीतील देवरूखवाडीत सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने डोंगराचा काही भाग कोसळून दरडी कोसळल्या आणि त्यात वाडीतील घरे गाडली गेली. यामध्ये काही जणांचे प्राण वाचविले , मात्र मायलेकांचा यात मृत्यू झाला. त्यांच्या वारसाना राज्य सरकारची मदत आज आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.
पावसाच्या पाण्याबरोबर भल्या मोठ्या दरडी आणि मातीचा काही भाग कोसळल्याने देवरुखवाडीत घरे मातीत गाडली गेली होती. शासनाने पाच लाखांची मदत जाहीर केली होती. त्यापैकी शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून प्रत्येकी चार लाखांची ही मदत देण्यात आली.
सरकारी विश्रामगृहावर आज आमदार पाटील यांच्या हस्ते तातडीची मदत म्हणून सदर धनादेश वारसांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी संगिता राजापुरकर-चौगुले, तहसिलदार रणजित भोसले, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता अमर किर्दत, नगरसेवक चरण गायकवाड, राजेश गुरव, रमेश गायकवाड, मदन भोसले, मामा देशमुख, बाळासाहेब चिरगुटे, राहूल शिंदे, गणेश भोसले, तलाठी अमोल कुंभार, ग्रामसेवक रमेश निगडे, कृषी सहाय्यक प्रशांत सोनावणे आदी उपस्थित होते.
यावेळी कोंढावळे येथील भुस्खलनात मृत झालेल्या वामन बाबाजी जाधव यांचे वारस यशवंत वामन जाधव, राहिबाई मारुती कोंढाळकर यांचे वारस रामचंद्र मारुती कोंढाळकर व भिमाबाई सखाराम वाशिवले यांचे वारस पार्वती दत्तात्रय शिळीमकर यांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लवकरच १ लाखाचा धनादेश देन्यात येईल असे यावेळी तहसिलदार भोसले यांनी सांगीतले.











