सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मागील काही दिवसांपासून विरोधकांच्या गोटातील प्रमुख कार्यकर्ते आपल्याकडे खेचून घेत बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. राज्यमंत्री भरणे हे डावपेच टाकत आपली राजकीय ताकद मजबूत करत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांकडून फारकत घेतलेल्या व राष्ट्रवादीची धोबीपछाड करत नामोहरम करुन इंदापूरची नगरपालिकेची सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या शहा कुटुंबीयांची भरणे यांनी इंदापूर येथील त्यांच्या निवासस्थानी येवून भेट घेतली.
माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांचे निकटचे सहकारी, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा, त्यांचे पुत्र इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, पुतणे इंदापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष,कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व विद्यमान नगरसेवक भरत शहा यांच्यामध्ये बंद दाराआड तासभर झालेल्या चर्चेत काय खलबते झाली हे जरी गुलदस्त्यात असले तरी आपल्या भरणे यांनी राष्ट्रवादी सोबत येण्याचे खुले निमंत्रण दिले असल्याची चर्चा दिसून येत आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष व इंदापूर शहराचे मातब्बर असणारे नेते प्रदीप गारटकर यांच्या पत्नी अनुराधा गारटकर यांचा अंकिता मुकुंद शहा यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव करत इंदापूर नगरपालिकेची सत्ता हस्तगत केली होती. आता मात्र राज्यमंत्री भरणे यांनी इंदापुरात लक्ष देऊन शहा कुटुंबास राष्ट्रवादीत खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शहा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची राजकीय कोंडी होईल काय? याची चर्चा सुद्धा इंदापुरात रंगली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आगामी काळात येणा-या नगरपरिषद,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालवलेली ही विरोधी पक्षातील इन्कमिंग ची मोहीम नक्कीच महत्वाची मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी मंत्री व सध्याचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे कोणती रणनीती वापरणार ? इंदापूरच्या राजकीय शह काटशहाच्या राजकारणाच्या रणभूमीवर बाजी कोण मारणार याची उत्सुकता इंदापूरसह संपूर्ण पुणे जिल्ह्याला लागून राहिली आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मागील दोन आठवड्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती व प्रतिस्पर्धी असणारे माजी मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांना समारंभपूर्वक आपल्या गोटात सामील करून घेऊन पहिला धक्का दिला. त्यानंतर काही कारणास्तव विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी सोडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सपकळ यांच्याशी समझोता करत त्यांनाही गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीत घेतले.
त्याच दिवशी इंदापूर मध्ये येवून भरणे यांनी माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांचे निकटचे सहकारी, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा, त्यांचे पुत्र इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, पुतणे इंदापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व विद्यमान नगरसेवक भरत शहा यांची इंदापूर येथील त्यांच्या निवासस्थानी येवून भेट घेतली.
तासभर चर्चा करुन त्यांना आपल्या सोबत येण्याचे खुले निमंत्रण दिले.त्यांच्या निमंत्रणाला शहा कुटुंबाने अद्यापपर्यंत कोणता ही प्रतिसाद दिला नाही. मात्र त्यांचा निर्णय तालुक्यात आगामी काळात होणा-या सर्व निवडणुकांवर परिणाम करु शकतो हे मात्र दुर्लक्षून चालणार नाही. गोकुळदास शहा,मुकुंद शहा व भरत शहा यांना आपल्याकडे येण्याचे खुले निमंत्रण देत, भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांना धक्का देण्याचा मोठा डाव टाकला आहे.
दिवंगत शंकरराव पाटील यांचे निकटचे सहकारी असणा-या गोकुळदास शहा यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात,विशेषतः उजनी पाणलोट क्षेत्राच्या परिसरात आहे. मुकुंद शहा यांच्या पत्नी अंकिता शहा विद्यमान नगराध्यक्षा आहेत. रचनात्मक कामे करण्याची मुकुंद शहा यांची हातोटी आहे. त्यांची साथ मिळाल्याने नगराध्यक्ष पदावर काम करत अंकिता शहा यांनी नगरपरिषदेस राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके मिळवून दिली आहेत.
विशेष म्हणजे इंदापूर शहरात सत्ता मिळाल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांमध्ये शहरातील प्रमुख विरोधक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या काही मातब्बर नगरसेवकांना राजकीय दृष्ट्या शांत करण्याचा करिष्मा दाखवला आहे. गेल्या साडेचार वर्षात शहरात विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आंदोलन करू न देणाऱ्या व व्यवस्थितरीत्या नगरपालिका हाताळणाऱ्या शहा कुटुंबाचे वजन शहरात बऱ्यापैकी वाढले आहे.
इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्षपद, कर्मयोगी सहकारीचे संचालक पद व नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदावर काम करणा-या भरत शहा यांचा जनसंपर्क दांडगा आहे. विठ्ठल विकास सोसायटीच्या माध्यमातून शहा बंधु पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मतदार ही आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ते उमेदवार असू शकतात.
नगरपरिषद व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोणाच्या ही पॅनेलला जिंकून देण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर त्यांचा करिष्मा चालूू शकतो.
नगरपरिषदेच्या मागील निवडणुकीत नगराध्यक्ष पद नागरिकांमधून निवडण्यात येणार होते.त्या वेळी प्रदीप गारटकर यांच्या पत्नी अनुराधा गारटकर व मुकुंद शहा यांच्या पत्नी अंकिता शहा यांच्यात मुख्य लढत झाली होती.
शहा यांनी बाजी मारल्याचे शल्य उरात बाळगणा-या प्रदीप गारटकर यांना या मुद्द्यावर सहमत करण्यात भरणे यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. भरत शहा यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देताना, आपण कार्यकर्ता म्हणून काम करु. हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ही साथ टिकवण्यासाठी हर्षवर्धन पाटील कोणते पाऊल उचलतात याचीही उत्सुकता लागली आहे.











