माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूणमध्ये पावसामुळे रस्त्यावरील अनेक पूल पाण्याखाली गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राजगड पोलिसांनी पुणे सातारा महामार्गावर सर्व प्रकारची शेकडो अवजड वाहने अडवली आहेत. परिस्थितीनुसार केव्हा वाहने सोडली जातील हे निश्चित सांगता येणार नाही.
गेल्या चार दिवसांपासुन राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूणमध्ये विविध घाटरस्त्यात दरडी पडण्याचे प्रमाण सुरु आहे. तसेच पावसाचा जोर वाढल्याने परजिल्ह्यातील गावांतील पूल पाण्याखाली गेले असून अनेक मार्गावरील ओढे नाले, नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत.
या मार्गाकडे जाणारी अवजड वाहने राजगड पोलिसांनी महामार्गावरील खेड शिवापूर, कामथडी, धांगवडी, किकवी, सारोळा परिसरात मालवाहतूक आणि अवजड वाहने अडवून बाजूला घेण्यात आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिले आहेत. दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग तळ ठोकून आहेत. पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स व आदी साहित्य लावून नागरिकास वाहनांना प्रवेश बंद केला आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीत महामार्गावर अडकलेल्या ट्रक चालक आणि वाहक यांना सामाजिक संघटना आणि पोलिसांच्या वतीने अल्फोहर आणि जेवणाची व्यवस्था करणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी सांगितले.











