मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती खरडून गेली
संदीप मापारी पाटील, बुलढाणा
गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून शेतामध्ये पाणी घुसून शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. महिन्याभरापूर्वीच हा दणका बसला होता त्यानंतर पुन्हा पावसाने शेती आणि शेतकऱ्यांना तडाखा दिल्याने जिल्ह्यामध्ये शेतकरी दु:खाने खचले आहेत.
हे चित्र सर्व तालुक्यात पाहायला मिळत असून गेल्या दोन वर्षांपासून अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत असलेल्या बळीराजाला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अस्मानी संकटाने तडाखा दिला आहे.
जिल्ह्यातील १३ ही तालुक्यातील बहुतांश गावातील जमिनींचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील महिन्यात देखील बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने मोठा तडाखा दिला होता आणि या तडाख्याने अनेक ठिकाणच्या जमिनी पाण्याच्या प्रवाहाबरोबर खरडून गेल्या. मातीच आता जमिनीत राहिली नसल्यामुळे आता पुढे काय करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला होता. आता पुन्हा एकदा उरलेल्या अनेक शेतकऱ्यांना देखील मुसळधार पावसाने दणका दिला आहे.











