नांदेड : महान्यूज लाईव्ह
शहरातील गाडीपुरा भागात विक्की ठाकूर या कुख्यात गुंडाची मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. गॅंगवॉरमधून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून यापूर्वी विक्की चव्हाण याची हत्या झाली होती, विक्की ठाकूर हा विक्की चव्हाण याचा साथीदार होता.
विक्की ठाकूर नुकताच जामीनावर सुटला होता. मंगळवारी रात्री दहाच्या आसपास तो घराजवळ थांबलेला असता दोन दुचाकीवरून दुसऱ्या टोळीतील हल्लेखोर आले आणि त्या पाच जणांनी विक्कीवर गोळीबार केला. मात्र तो वाचवून विक्की तेथून पळत सुटला.
त्यानंतर हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला, पाठलाग करताना त्याच्यावर गोळ्याही झाडल्या. त्यानंतर तो पडला असता, त्याच्यावर तलवारीने वार केले. हल्लेखोरांनी विक्की ठाकूर हा गंभीर जखमी झाल्याचे पाहून हवेत गोळीबार करून तेथून पळ काढला. दरम्यान या हल्ल्यात विक्की ठाकूर हा जागीच मृत झाला.











