सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या कोरोना सेंटर मध्ये साधारण दोन महिन्यापूर्वी कोरोना ग्रस्त सासू व सासरे यांच्या वर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मानसिक आधार देत योग्य वैद्यकीय उपचार केल्यामुळे ते कोरोनातुन मुक्त झाले. मात्र त्या काळात तेथील उपचार घेणाऱ्या कोरोना रूग्णांसाठी फॅन (पंखे) च्या सुविधेचा अभाव दिसून आला. सासू सासऱ्यांसह सर्व रुग्णांवर चांगले उपचार करून मानसिक बळ देणाऱ्या रुग्णालयास मानवतेच्या दृष्टिकोनातून निमगाव केतकी येथील श्री.मोबाईल शॉपीचे संचालक सुहास जाधव यांनी निमगाव केतकी येथील कोविड सेंटरला फॅन चा संच भेट दिला.
सुहास जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी फॅनचे संच निमगाव चे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद खाडे यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांसह, श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय या सर्वांनाच कोरोनाच्या महामारी विषयी मनात धडकी भरली असतानाच वैद्यकीय यंत्रणेवरही खूपच ताण पडतो.
येथील रुग्णांवर उपचार करताना सेवा देण्यास डॉक्टर्स सिस्टर व कर्मचारी यांनी खूप चांगली सेवा दिली. अशाच परिस्थितीत निमगाव केतकी येथील सुहास जाधव यांनी त्यांचे सासरे गणपत राऊत व मनोरमा राऊत यांना मानसिक बळ दिले. खूप चांगली वैद्यकीय सेवा देऊन त्यांना कोरोना रोगमुक्त केले. सुहास जाधव यांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून फॅनचे संच दिले.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना ने अक्षरश: थैमान घातले असून लाखो लोकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना ची दुसरी लाट संपतेच असे वाटत असतानाच तिसरी लाटेचा शिरकाव होणार असल्याचे भाकित करण्यात येत आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या कोरोना ग्रस्त रुग्णांना आवश्यकता असणाऱ्या फॅनची गरज पूर्ण झाली आहे. यावेळी सुहास जाधव, गणपत राऊत, डॉ.मिलिंद खाडे, गणेश घाडगे, नितीन आदलिंग, गणेश शेळके, आदेश रासकर व निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते.











