बारामती : महान्यूज लाईव्ह
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुक्त झालेल्या बारामती शहरात आज नव्याने एका २९ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील दूध संघ वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेल्या या तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
बारामती शहरात मागील महिनाभरापासून एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. आज मुख्य शहरात असलेल्या दूध संघ वसाहतीमधील २९ वर्षीय तरुणाची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेल्या कोरोनाने बारामती शहरात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
कोरोनाचा रुग्ण निश्चित झाल्यानंतर दूध संघ वसाहत परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी अत्यावश्यक सेवांशिवाय अन्य वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. नागरीकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.











