विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे हातात कोयता घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीचे डायलॉग जोडून व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला की कोणी दादा बनत नसतो.. तसेच दुकानाचे नाव ‘यम’ ठेवले म्हणून स्वतः ‘यमा’ सारखं वागायचं नसतं…! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अशाच एका ‘यमा’ला त्याची जागा दाखवली आहे. पोलिसांच्या खाक्या नंतर त्याचा ‘मुर्गा’ कधी बनून गेला त्यालाही कळलं नाही.
मयुर अनिल सरोदे वय 21 असे त्याचे नाव असून त्याचे ‘एम भाई’ नावाचे कपड्याचे दुकान आहे. त्यानं मध्यंतरी हातात कोयता घेऊन वेगवेगळे डायलॉग जोडून त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून पसरवला. मात्र यामागे तो दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसताच पिंपरी-चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकल्या…
मयूर सरोदे याने हातात कोयता घेऊन छक्क्या पंज्याचं ऐकून कुत्री पण ताठ चालतात, पण आमची सूत्र येरवडा जेलमधून हलतात.. लावा ताकद! अशा प्रकारचे डायलॉग जोडून व्हिडिओ तयार केले होते आणि ते व्हायरल केले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या नेतृत्वाखालील हुंडा विरोधी पथकाने त्याची चांगलीच झाडाझडती घेतल्यानंतर त्यांनी हात जोडून पोलिसांची माफी मागितली.