दौंड तालुक्यातील केडगाव येथील घटना! देवदूताने च्या प्रसंगावधानामुळे वाचले चिमुकल्याचे प्राण!
शिरूर : महान्यूज लाईव्ह
केडगाव (ता.दौंड) येथील एका महिलेची रुग्णालयात प्रसूती झाली. प्रसूतीनंतर नवजात बालकाचे कौतुक होत असताना जिभेला सोने लावण्याच्या प्रथेदरम्यान बाळाच्या पोटात गेली. यावेळी सगळ्यांच्या चिंता वाढल्या असतानाच पुण्यातील डॉक्टरांनी केलेल्या अचूक निदानाने व उपचारांमुळे पाच तासांच्या बाळाचा जीव वाचला आहे.
याबाबत सविस्तर असे की, केडगाव (ता.दौंड) येथील खासगी दवाखान्यात एका महिलेची प्रसूती झाली होती. प्रसूती झाल्यानंतर लहान बाळाचे कोड कौतुक केले जात होते. सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. लहान बाळ जन्मल्यानंतर अनेक ठिकाणी बाळाची वेगवेगळ्या प्रकारे स्वागत केले जात असते.
काही ठिकाणी बाळाच्या जिभेला,ओठावर,सोने लावण्याची, चाटवण्याची प्रथा आहे. या बाळाचेही स्वागत करताना नातेवाईक महिलांनी एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी बाळाच्या जिभेला लावली. काही कळायच्या आत ही अंगठी बाळाच्या पोटात गेली.
अंगठी कुठे दिसेना म्हणून नातेवाईकांनी शोधाशोध केली. मात्र अंगठी कुठे मिळून येत नव्हती. यावेळी काहींनी बाळाच्या पोटात गेली असेल म्हणून क्ष किरण तपासणी केली. ही अंगठी बाळाच्या पोटात दिसून आली. आता मात्र सगळेच चिंतातुर झाले.
सदर अंगठी काढणे गरजेचे होते. तत्काळ नवजात बालकाला मोठ्या दवाखान्यात दाखल करणे गरजेचे असल्याचे पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले. रुबी हॉल येथील डॉ.कांचनकुमार यांनी प्राथमिक तपासणी करून रुबी हॉल दवाखान्यात दाखल करून घेतले.
डॉ. किरण धनंजय शिंदे, (मेडिकल ग्रॅस्ट्रो एनटोरोलॉजिस्ट अँड एंडोस्कोपी तज्ञ) यांनी तातडीने दुर्बिणीद्वारे अंगठी काढण्याचे ठरवले. अवघ्या काही तासांचेच आयुर्मान असलेल्या बाळाच्या जीवाला रिंगमुळे धोका उद्भवू शकत होता. टोकदार रिंगमुळे आतड्याला इजा होण्याची दाट शक्यता होती. या सर्व गोष्टी विचारात घेवून नातेवाईकांना विश्वासात घेऊन समजावून सांगण्यात आले.
अत्यंत जड अंतःकरणाने डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून नातेवाईकांनी परवानगी दिली. भूलतज्ञ डॉ नंदिनी लोंढे यांनी अत्यंत कौशल्याने बाळाला पूर्ण भूल दिली. डॉ किरण शिदे यांनी अतिशय सावधगिरी ने आपले सर्व कौशल्य पणाला लावून डॉ. नंदिनी लोंढे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अंगठी अलगदपणे पोटातून काढली..!
थोड्या वेळाने बाळ रडत असल्याची खातरजमा करून यशस्वीरित्या वॉर्डमध्ये नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. या विषयी माहिती देताना डॉ किरण धनंजय शिंदे म्हणाले की, लहान मुले बऱ्याच वेळा पैशाचे नाणे, क्लिप, पिन, खिळा, स्क्रू, पेन्सिल अशा बाहय वस्तू गिळतात पण
नुकत्याच जन्मलेल्या बाळाने काही तरी बाह्य वस्तू (फॉरेन बॉडी) गिळणे ही दुर्मिळ घटना आहे.
कोणत्याही वस्तूमुळे आतडे बंद होण्याची, आतड्याला जखम होण्याची शक्यता असते. विना शस्रक्रिया दुर्बिणीद्वारे अंगठी काढतांना भूल तज्ञ डॉ. नंदिनी लोंढे आणि सर्व टीम ची मदत झाली तसेच रुबी हॉल मधील अद्ययावत स्कोपचा आणि मशीनरीचा उपयोग झाला असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.










