पुणे : महान्यूज लाईव्ह
पत्नीच्या कथित अनैतिक संबंधाला कंटाळून चिडलेल्या पतीने पुण्यातील हडपसर भागात भररस्त्यात पत्नीचा चाकूने गळा चिरला व तिचा खून करून स्वतःही आत्महत्येचा त्याने प्रयत्न केला, मात्र भावाने समजूत घातल्यानंतर तो पोलिसांपुढे हजर झाला. या धक्कादायक घटनेनंतर हडपसर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
नितीन निकम (वय 27 रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ गाव दहिगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षापूर्वी नितीनचा विवाह झाला होता. त्यांना 4 वर्षांचा मुलगा आहे. नितीन भोसरीतील कंपनीत इलेक्ट्रिशियनचे काम करतो. तर पत्नी गृहिणी होती. तिची वर्तणूक चांगली नसल्याचा व तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यातून पती नितीन त्रस्त होता. पत्नीला अनेकवेळा समजावून सांगूनही ती ऐकत नव्हती. दरम्यान ती हडपसर भागात राहत असलेल्या आईकडे आली होती. तर नितीनचा भाऊ आजारी असल्याने तो पुण्यात उपचारासाठी आला होता. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर आज त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले होते. यावेळी नितीन पत्नीला घेऊन जाण्यासाठी म्हणून आईकडे आला.
त्याने तिला घरी नेण्यासाठी प्रयत्न केले. पण तीने घराकडे येण्यास नकार दिला. मला मुलगा देखील नको, असे ती म्हणाली. यावेळी नितीनने तिला आपल्याला मुलाला मोठ्या भावाबरोबर गावाकडे पाठवायचे आहे. पण तो भावासोबत जात नाही. आपण त्याला सोडून येऊ असे सांगून बाहेर आणले. दुचाकीवर ते जात असताना बंटर स्कूलच्या पाठीमागे दुचाकी उभी करून लघुशंका करतो असे सांगून नितीन बाजूला गेला. तिला दुचाकी धरण्यास सांगितले. तिने दुचाकी धरल्यानंतर नितीनने पाठीमागून जाऊन तिचा चाकूने गळा चिरून खून केला.
त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण आत्महत्येपूर्वी त्याने भावाला फोन केला. तसेच मी पत्नीचा खून केला आहे. माझ्या मुलाला सांभाळ असे सांगितले. त्यावेळी भावाने त्याची समजूत काढली अन् आत्महत्या करण्यापासून रोखले. त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. मग तो पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीच्या खूनाची माहिती दिली.











