राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह.
दौंड : तालुक्यातील पाटस येथील दोन युवकांचा हत्याकांडातील अटक केलेल्या आरोपींना दौंड न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, या हत्याकांडात उर्वरीत आरोपींचा तपास पोलीस करीत आहेत. मात्र या प्रकरणाबाबत पाटस परिसरात विविध प्रकारच्या चर्चांना उधान आले असून अनेक तक्रवितर्क काढले जात आहे.
पाटस येथे 4 जूलै रोजी शिवम संतोष शितकल (वय 23) आणि गणेश रमेश माखर (वय २३ ) या दोन तरूणांची निघृण हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींना जेरबंद ही केले होते. याप्रकरणी आठ जणांवर यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दौंड न्यायालयाने 6 जुलैला या चार आरोपींना पाच दिवसांची (दि.10) पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले होते. आज शनिवारी (दि.10) या आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची सोमवार (दि.12) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे पोलीसांना पुढील तपास करण्यासाठी पुढील तीन दिवसांचा अवधी मिळाला आहे.
याप्रकरणाचा तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हयाचे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख हे या प्रकरणात स्वतः लक्ष घालून आहेत. यामुळे मागील पाच सहा दिवसात पोलीसांनी या हत्याकांडाच्या अनुषंगाने विविध पैलूने तपास सुरू केला आहे.
याप्रकरणात उर्वरीत आरोपी कोण आहेत हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. यामुळे उर्वरीत आरोपी का अटक केले गेले नाहीत. याबाबत मयत तरूणांचे नातेवाईक अनेक शंका उपस्थित करीत आहेत. याप्रकरणात उर्वरीत आरोपींना वाचविण्यासाठी पोलीसांवर राजकीय दडपण तर नाही ना? अशा विविध प्रकारची चर्चा पाटस परिसरात आहे.
या गुन्ह्यात लाल रंगाची स्विफ्ट आणि पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी वापरली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीसांना अद्याप या वाहनांचा तपास का लागला नाही? ही शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान पुढील तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत गुन्हेतील वाहने आणि उर्वरीत आरोपी निष्पन्न होवून त्यांना अटक केले जाईल अशी अपेक्षा नातेवाईक आणि ग्रामस्थांची आहे.











