पुणे : महान्यूज लाईव्ह
कोणती आपत्ती कोणासाठी आपत्ती व कोणासाठी इष्टापत्ती ठरेल याचा नेम नाही. आता हेच बघा ना.. पुण्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची मालमत्ता हडपण्यासाठी एका अन्य महिलेला मास्क लावून उभे केले आणि चक्क मालमत्ता नावावर करून घेतली.. या घटनेने पोलिसही चक्रावले असून मुद्रांक विभागही चक्रावला आहे. दरम्यान पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात पती राहुल शिवाजीराव जाधव (वय 32 रा. आंबेगाव पठार ), वकील प्रदीप बी. जाधव, पतीचा मित्र दीपक चव्हाण आणि एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कविता राहुल जाधव यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कविता या आरोपी राहुल जाधव यांच्या पत्नी असून दोघेही आंबेगाव पठार भागात राहतात. दोघांच्या नावावर संयुक्तरित्या आंबेगाव येथील साई रेसिडेन्सी या इमारतीत 3 सदनिका व आंबेगाव परिसरात एक मिळकत होती.
मात्र, या मालमत्तेचे अधिकार केवळ आपल्याकडेच राहिले पाहिजेत, या हेतूने राहूल याने वेगळीच चाल रचली. भविष्यात पत्नी कविता हिने मालमत्तेच्या बाबतीत आपला हक्क दाखवून ब्लॅकमेलिंग करू नये यासाठी राहुलने इतर आरोपींना हाताशी धरून मुद्रांक व नोंदणी कार्यालयात पत्नी ऐवजी दुसरीच महिला मास्क घालून उभी केली आणि आधारकार्ड व इतर कागदपत्रे मात्र पत्नी कविता हिचीच सादर केली आणि तिची सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली.
याप्रकरणाची खबर कविता यांना उशीरा लागली. मात्र जेव्हा हे प्रकरण कळले, तेव्हा कविता यांनी सहकारनगर पोलिसांकडे धाव घेतली व तक्रार दिली. या तक्रारीचा तपास करताना पोलिसही चक्रावून गेले. कोण कोणत्या थराला कसा जाईल याचा काही नेम राहीलेला नसून आतापर्यंत मास्क घालून आरोपी आपली ओळख लपवू शकत होते, मात्र मास्कचा वापर करून खरी व्यक्ती न उभी करता बनावट व्यक्ती उभी करून मालमत्ता हस्तांतरण केले जात असल्याने पोलिसांनाही धक्का बसला.