माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – बँका, महाविद्यालये, भाजीविक्रेते अशा सतत लोकसंपर्क असणाऱ्या व्यक्तींनी आपली कोव्हीड-१९ चाचणी करून घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सर्दी, खोकला तसेच सॅनिटायझर चा वापर करणे आदीबाबत नसरापूर परिसरात शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर व मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त कोव्हीड-१९ जनजागृती अभियान राबविण्यात आले.
नसरापूर ( ता. भोर ) येथील आदिवासी वस्तीवरील लोकांचे प्रबोधन करून जनजागृती करण्यात आली. यावेळी गरीब महिला, लहान बालके, वृध्द व्यक्ती यांना तसेच नसरापूर बाजारपेठेमध्ये सॅनिटायजर आणि मास्क वाटप करण्यात आले. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण नोंदणी करणे, प्रत्यक्ष लस घेतलेल्यांनी आपल्या दिलेल्या वेळेत दुसरी लस घेणे, बाजारपेठ, बसस्टॉप व इतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी करणे, सामाजिक अंतर, वारंवार स्वच्छ हात धुणे, तीन लेअर असलेले मास्क वापरणे बाबत जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी कोव्हीड-१९ ची दुसरी लाट अजून ओसरली नसून तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याने कोव्हीड-१९ प्रतिबंध उपाय म्हणून स्वयंशिस्त महत्वाची पाळावी. तसेच देशात ४५ हजाराच्या आसपास दररोज नव्याने रुग्ण मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. जगदीश शेवते यांनी भोर-वेल्हा तालुक्यात जिल्हा प्रशासनाने पर्यटनास बंदी घालूनही बनेश्वर, रायरेश्वर, तोरणा, राजगड, मढेघाट या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आवर घालणे महत्वाचे आहे. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, डॉ. राजेंद्र सरोदे, प्रा.सहदेव रोडे, महेश दळवी यांनी केले होते.