संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार : मागील दोन दिवसांपासून लोणार कोविड सेंटरवर निकृष्ट भोजन मिळत असल्याची छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल केली जात आहेत. या फोटो चा संदर्भ घेउन लोणार येथील कोविड सेंटर व आरोग्य विभागाची बदनामी केली जात असल्याचे रुग्णांनीच सांगितल्याने खोडसाळपणा करणारे उघडे पडले आहेत.
या रुग्णांनी खुलासा पत्रात नमूद केल्याप्रमाणे येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाना अतिशय नम्र व उत्कृष्ट सेवा आरोग्य विभागामार्फत दिल्या जात असून काही सोशल मीडिया व प्रसारमाध्यमे येथे दाखल रुग्णांचा हवाला देत या कोविड सेंटरची बदनामी करु पहात आहेत, वास्तविक येथे चांगल्या सुविधा दिल्या जात असून आरोग्य विभाग, व्यवस्थापन यांच्याविरूध्द आमची कोणतीही तक्रार नसून आम्हाला चांगल्या सेवा दिल्या जात आहेत असे या रुग्णांनी स्पष्ट केले आहे.
भोजनासंदर्भातील तक्रारीची लोणार तहसीलदारांनी दखल घेतली असून आमची यासंदर्भात कोणतीही तक्रार नसल्याचे रुग्णांनी स्पष्ट केले आहे. येथील कर्मचारी जिवाचे रान करून रुग्ण सेवा देत आहेत, त्यांचे मनोबल खच्ची करु नये अशी अपेक्षा या रुग्णांनी व्यक्त केली आहे.
डॉ भास्कर मापारी, व्यवस्थापक कोविड सेंटर लोणार –या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेला कुणीही बदनाम करु नये. येथे निस्वार्थीपणे वैद्यकीय सेवा दिल्या जातात.
हेमंत पाटील, प्रभारी तहसीलदार लोणार – कोविड सेंटरवर दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जा संदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे आदेश जेवण पुरवठादाराला दिले आहेत.
डॉ किसन राठोड, तालुका आरोग्य अधिकारी लोणार –जेवणाच्या दर्जाचे निमित्त करून संपूर्ण आरोग्य यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चूक आहे त्यामुळे कोरोना योद्ध्यांचे निश्चितच मानसिक खच्चीकरण होते आणि हे दुर्दैवी आहे.