मुंबई : महान्यूज लाईव्ह
भोसरी जमीन व्यवहार प्रकरणात न्यायमूर्ती झोटिंग समितीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना क्लीन चीट दिल्यानंतर काल रात्री पुन्हा एकनाथ खडसे यांची जावई गिरिश चौधरी यांना ईडीने याच प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात एकनाथ खडसे यांच्या भोवती देखील ईडीचा कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ईडी ही भाजपची प्रेयसी आहे, नाथाभाऊ आता सीडी काढाच असे स्पष्ट केले आहे.
एकनाथ खडसे यांचे जावई गिरिश चौधरी तसेच मुलगी शारदा यांची गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयामार्फत चौकशी सुरू होती. खडसे यांच्या कन्या शारदा ईडी समोर आल्यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना वसुली अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली होती.
त्यानुसार गिरिश चौधरी काल ईडी समोर हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर त्यांची चौकशी केली आणि रात्री त्यांना अटक केल्याचे ईडीच्या वतीने सांगण्यात आले. पदाचा गैरवापर करून खडसे यांनी भोसरी येथील एमआयडीसी येथील जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत भाजपच्या बारा आमदारांना निलंबनाची कारवाई केल्याबद्दल भाजपने अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कारण ईडी ही भाजपची प्रेयसी आहे. बारा आमदार निलंबित होताच, भाजपने एकनाथ खडसे तसेच महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांविरोधात अशा स्वरूपाची कारवाई सुरू केली आहे. तेव्हा आता नाथाभाऊ देखील सीडी बाहेर काढतील आपण त्याची वाट पाहू यात असे स्पष्ट केले आहे.