शिरूर : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे रुग्णवाहिका अभावी हाल झाले.. हे सगळे जवळून अनुभवल्यानंतर जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी पाठपुरावा केला अन् गावात रुग्णवाहिका उभी राहिली…!
ग्रामस्थांनीही आनंदाने स्वागत केलेली ही रूग्णवाहिका शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांच्या प्रयत्नातून मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास १४ व्या वित्त आयोगातून मिळाली. या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
शिरूर तालुक्यातील पूर्व भागात कोरोना च्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याने अनेक कुटुंबेच्या कुटुंबे ही बाधित झाली.यामध्ये अनेकांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने प्राणास मुकावे लागले.
रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेत जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेकडे याबाबत मागणी करत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोग निधीतून रुग्णवाहिका मंजूर झाली होती.
मंगळवार (दि.६)रोजी या नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने वडगाव रासाई, शिरसगाव काटा, इनामगाव, पिंपळसुटी, गणेगाव दुमाला, बाभूळसर बुद्रूक, सादलगाव, तांदळी, कुरुळी आदी गावांना रुग्ण वेळेत दवाखान्यात पोहोचण्यासाठी मदत होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी सांगितले.
यावेळी शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, सभापती मोनिका हरगुडे, मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.मंजुषा सातपुते यांसह परिसरातील सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.