पुणे : महान्यूज लाईव्ह
बांधकाम व्यवसायाकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला आज पुणे पोलिसांनी अटक केली. गेल्या वर्षापासून रवींद्र बऱ्हाटे हा फरार होता.
बांधकाम व्यवसायिक सुधीर कर्नाटकी यांच्याकडून एक फ्लॅटचा करारनामा आणि दीड लाख रुपये घेऊन दोन कोटींची खंडणी आणि रास्ता पेठेतील जागेची मागणी केल्याप्रकरणी पाच जणांवर मागील वर्षी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यातील तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून, रवींद्र बऱ्हाटे आणि अमोल चव्हाण हे त्यावेळी फरार होते. दरम्यान आज रवींद्र बऱ्हाटे याला पुण्यात पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली.
रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप याच्यासह 13 जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झालेली आहे. बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटितपणे टोळी करून खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बंगला बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. हडपसरच्या गुन्ह्यासह त्यांच्याविरुद्ध शहर व ग्रामीण भागामध्ये 14 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.