स्वप्नील लोणकर यांच्या कुटूबांची घेतली भेट
दौंड : महान्यूज लाईव्ह
राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या दोन वर्षापासून बेरोजगार असलेल्या स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली. या घटनेचे पडसाद राज्यात उमटलेले. या प्रकरणावरून विरोधकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह आघाडी सरकारला जबाबदार धरत टिका केली. आज मंगळवारी (दि.6) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी दौंड तालुक्यातील केडगाव येथे आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटूंबांची भेट घेतली.
यावेळी ठाकरे यांनी मनसेच्या वतीने दोन
लाख रूपयांची आर्थिक मदत केली. मनसे नेते अमित ठाकरे यांनी आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकर याची आई, वडील आणि बहिण तसेच इतर नातेवाईकांचे सात्वन केले. यावेळी त्यांच्या कुटूंबियाला आधार दिला. भविष्यात कसली मदत लागली तर मनसेला हाक द्या, आम्ही धावून येवू. पाहिजे ती मदत करू असे आश्वासन मनसे नेते अमित ठाकरे यांनी या कुटुंबाला दिले.
दरम्यान, यावेळी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारमधील 2 लाख पदे रिक्त आहेत, मात्र ही पदे सरकार का भरीत नाही? ही रिक्त पदे भरण्यासाठी सरकार नेमके कोणाची वाट बघतेय? सरकारी नोकरी मिळत नसल्याने तरूण आत्महत्या करीत आहे. हे सरकार झोपले आहे का? या घटनेनंतर तरी हे सरकार जागे होणार आहे का नाही? असा सवाल करत ठाकरे यांनी यावेळी आघाडी सरकारवर टिका केली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर, सागर पाटसकर, दौंड तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, मंगेश साठे तसेच पुणेशहर आणि जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.