बारामती : महान्यूज लाईव्ह
शिवेवरच्या स्वप्नील लोणकरने नैराश्यातून केलेल्या आत्महत्येने कोरोनाचा सामना करत, कसेबसे घर चालवणाऱ्या अनेकांच्या उरात धडकी भरवली आहे.. पहिल्या लाटेत कसेबसे कुटुंब जगवलेल्या, पण मिळेल ते काम करणाऱ्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरचा जगण्याचा सामना आता जिकिरीचं वाटू लागला आहे.. तरीही कोणी बोलत नव्हतं.. दौंड तालुक्यातील केडगावच्या स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली आणि अनेकांच्या जगण्याच्या लढाईचा बांध फुटला..!
बारामती शहरात काम करणारे गणेश सांगत होते.. मी फक्त सात हजारात घर चालवतोय..! मुलं मोठी झाली आहेत.. शाळा बंद असल्या, तरी शाळेची फी काही बंद नाही.. त्यांचा खर्चही काही कमी नाही, घराचे भाडे साडेचार हजार रुपये देऊन घर चालवतोय, मला पुढे तर काय होईल, ते सांगता येत नाही. दोन-अडीच हजार रुपयात घर चालवणे मुश्कील आहे. अशातूनही मी घर चालवतोय.
कधीच घराबाहेर न पडलेली माझी बायको देखील घर चालवण्यासाठी मी काहीतरी करते असं सांगू लागली, तेव्हा माझ्या मनाची कालवाकालव झाली. माणसाला सर्वात जास्त काय महत्वाचे असेल तर तो माणसाचा जीव..! स्वप्निल लोणकरला जीव देखील महत्त्वाचा वाटला नाही, त्यावरून एक लक्षात घेतलं पाहिजे की, आजची पिढी किती निडर आहे आणि त्यापेक्षाही किती लवकर नैराश्यात जाते! एवढे निराशेचे ढग पाहिले, पण माझ्या मनात अजून तरी आत्महत्येचा विचार आला नाही. तो येऊच नये म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा..! मला कोणीही पैसे देऊ नका, पण माझ्यासारख्या अनेक लोकांच्या पाठीशी नक्की उभा राहा. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना कसाबसा केलाय, जर तिसरी लाट आली आणि काही बंद पडलं तर जगणं मुश्कील होऊन जाईल..!
रोजंदारीवर काम करतात, त्यांचं काय चाललंय?
केवळ त्यांचीच एवढीच परिस्थिती नाही, बारामतीमध्ये रस्त्यावरील व्यवसायिक, पथारीवाले आणि जगण्याच्या लढाईत छोटी-मोठी कामे करून घर चालवणाऱ्या अनेकांपुढे अशाच स्वरूपाचा प्रश्न उभा राहिला आहे आणि उद्या काय होणार याची फार मोठी भ्रांत या सर्वांना आहे! बारामती मध्ये तीन हत्ती चौक आहे. हा मजूर अड्डा म्हणून देखील ओळखला जातो. या चौकात सकाळच्या वेळी दररोजच्या रोजगाराची कामे शोधणारे अनेक जण असतात मागील पाच-सहा वर्षात त्यांना खूप मागणी होती मध्यंतरीच्या काळात मागणी घटली आणि कोरोनाच्या काळात तर ती अगदी शून्यावर आली. कमी पैसे द्या पण काहीतरी काम द्या असे म्हणण्यापर्यंत मिळालेल्या या मजुरांमुळे देखील फार मोठा प्रश्न कोरोनाने उभा करून ठेवला आहे.
नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का…
शेतीपुढचे प्रश्न देखील खूप गंभीर करून ठेवले आहेत. दोन वर्षांमध्ये शेतीला भाव नाही. ग्राहकांना कमी दरात शेतमाल नाही आणि उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. या हंगामात मार्च-एप्रिलमध्ये तर सोन्यासारखी कलिंगड अगदी दोन रुपये किलो, तीन रुपये किलो पर्यंत घसरले.भाजीला देखील भाव नव्हता, पण त्याच वेळी भाजीपाला विकणारा मात्र अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला विकत होता.
त्यामुळे जेवढे पैसे शेतकऱ्यांना घाम गाळून मिळाले नाहीत, त्याच्या दुप्पट, तिप्पट पैसे फक्त दुसऱ्याच्या जागेत बसून शेतमाल विकणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांनी देखील कमावले. वस्तुतः ग्राहक, विक्रेते, व्यापारी आणि शेतकरी यांची साखळी नैतिकतेची असायला हवी. ती विकृतीकडे या कोरोनाच्या काळात झेपावली. लोकांची गरज लक्षात घेऊन, मालाचे भाव कृत्रिमरित्या वाढवले गेले. त्याचा परिणाम असा झाला की, ना शेतकऱ्यांच्या पोटात, ग्राहकांच्या ओठात असा सगळा प्रकार राहिला. खरेतर कोरोनाच्या काळात मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाणाऱ्या अनेक विविध प्रवृत्ती पाहायला मिळाल्या. त्यामध्ये मेडिकल दुकानदारापासून दवाखान्यापर्यंत आणि दवाखान्यातील सेवा सुविधा पुरवणाऱ्यापासून ते स्मशानापर्यंत अनेकांनी आपला वाटा हिसकावून घेतला.
कोरोनाची लाट जशी ओसरते आहे, तसतसे आपण नेमकी काय गमावले, याचा विचार सामान्य माणूस करतो आहे. जसे एखादा महापूर ओसरल्यानंतर त्या महापुरात घरातील नेमके काय काय वाहून गेले, या शोधात एखादे कुटुंब असते, त्याप्रमाणे सध्या अनेक कुटुंबे या कोरोनाने आपले काय हिरावून घेतले याचा विचार करत नैराश्यात आहेत. अशा कुटुंबातील कर्त्या पुरुषांना आता आधार देण्याची गरज आहे आणि हा आधार फक्त हातावरचे पोट असणाऱ्यांनाच नाही, तर शेतकऱ्यांना, कमी पगारावर नोकरी करणाऱ्या लोकांपासून ते स्वयंरोजगार करणाऱ्या अनेकांना देण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यातही समाजाने दोन शब्द आधाराचे, दोन शब्द कौतुकाचे, त्यांच्यासाठी वापरण्याची गरज आहे, तर आणि तरच जगण्याची साखळी टिकेल.. अन्यथा अनेक जण स्वप्निलच्या मार्गाने जातील ही भीती आहे..!