विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे : खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला लोणीकंद पोलिसांनी आव्हळवाडी फाटा (ता. हवेली) येथून शुक्रवारी (ता. ०२) अटक केली आहे. पोलिसांनी दोन दिवसाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्यामुळे नागरिकांकडून आणि वरिष्ठ अधिकार्यांकडून लोणी कंद पोलिसांचे कौतुक होत आहे.
सागर इटकर (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, सागर इटकर हा वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठलवाडी परिसरातील सिस्का कंपनी वेअर हाऊस या कंपनीमध्ये कामाला होता. सागर हा कंपनीच्या कामात हलगर्जीपणा करीत होता. म्हणून कंपनीचे प्रभारी अधिकारी सुशिल रोकडे यांनी सागरला कामावरून काढून टाकले होते.
यामुळे सागर याला सुशिल रोकडे यांचा राग आला होता. सुशिल रोकडे यांची बुधवारी (३० जून) साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुट्टी झाल्यानंतर कंपनीच्या बाहेर आले असता, सागरने रोकडे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने खांदयावर व मानेवर सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आणि सागर सदर ठिकाणावरून फरार झाला. रोकडे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. आणि त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव आणि लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे, सहा. फौजदार मोहन वाळके, पोना कैलास साळुंके, पोना अजित फरांदे, पोना विनायक साळवे, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, सागर कडु आणि बाळासाहेब तनपुरे यांचे पथक तयार करण्यात आले.
सदर पथकातील पोलिसांना आरोपी सागर इटकर हा त्याच्या आईला भेटण्यासाठी वाघोली (ता. हवेली) येथील आयमॅक्स हॉस्पीटलच्या जवळ आलेला असल्याची माहिती एका खबर्यामार्फत मिळाली. सदर पथकाने आरोपीला पकडण्यासाठी वाघोलीत सापळा लावला.
पोलिसांना आरोपी सागर हा आव्हळवाडी फाटा येथे फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा केल्याचे तपासादरम्यान निष्पन झाले. सागर इटकर हा एक सराईत गुन्हेगार आहे. या अगोदरच सन २०१७ मध्ये एस. टी. बसच्या वाहकास जीवे मारणेचा प्रयत्न केल्याप्रकरणी परांडा (जि. उस्मानाबाद) येथे गुन्हा दाखल आहे. लोणीकंद पोलिसांनी सागरला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.