मुंबई : महान्यूज लाईव्ह
ओबीसींचा इंपिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडला, तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आई-माईवरून शिवीगाळ केली.. खुद्द तालिका सभापती भास्कर जाधव यांच्यासमोरील माईक ओढला. भास्कर जाधव यांना शिवीगाळ करण्यात आली. यासंदर्भात विधानसभेत आवाजी मतदानाने भाजप आमदारांचे निलंबन करण्यात आले. डॉ. संजय कुटे, संजय कुटे, आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, नारायण कुचे यांना एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले,
सभागृहातील ही परिस्थिती लांछनास्पद असल्याचा आरोप जाधव यांनी केला. ओबीसी समाजासाठी तुमचा राग का असावा? असा प्रतिप्रश्न करीत जाधव यांनी घडलेला प्रकार सांगितला. आम्ही काय नेमके करायला निघालोय? महाराष्ट्राची संस्कृतीला काळिमा फासण्याचा हा प्रकार आहे. संसदीय कार्यमंत्र्यांना आदेशवजा सूचना म्हणजे म्हातारी मेली तरी दुःख नाही, काळ सोकावता कामा नये, याचा निर्णय झालाच पाहिजे की, शिवीगाळ कोणी केली हे समजले पाहिजे. भाजपवाले म्हणतात की, मीच शिवीगाळ केली. मीच नाही, तर संपूर्ण सभागृहाने हे ऐकलेले आहे. देवेंद्र फडणवीस तुम्हाला राग येतो, भास्कर जाधव काय कमी आहे का? मी आक्रमक आहे, मात्र संसदीय कार्यप्रणालीत मला कधी चुकीचे बोललो म्हणून माफी मागावी लागलेली नाही. मी काहीच बोललो नाही. मी सगळ्यांशी संबंध चांगले ठेवूनही तुम्ही मला शिवीगाळ करता? आमची पदे काही कायमची नसतात. म्हणूनच मी सातत्याने सौहार्दाने वागलो. इथून बाहेर पडल्यानंतर आपण सारे मित्र असतो, मात्र आत जे काही घडले, महाराष्ट्राच्या परंपरेसाठी अत्यंत चुकीचे आहे. माझी माफी फक्त आशिष शेलार यांनीच मागितली. मात्र ती देखील अगोदर अरेतुरे करीत माझ्यावर तुटून पडल्यानंतर माफी मागितली. भास्करराव जाऊ द्या, म्हणत माफी मागितली. म्हणजे लाथ मारायची व नंतर जाऊ द्या, म्हणून..!
देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही शिवसेनेचे आमदार आले होते. आपल्याशी धक्काबुक्की झालेली नाही. भाजप व शिवसेनेदरम्यान धक्काबु्क्की झाली. आपल्याशी झालेली नाही. आम्ही रागात होतो हे खऱे आहे. आपण गळाभेट घेतली हेही खरे आहे. मात्र त्यानंतर अशा प्रकारचा प्रस्ताव आपण आणता आहात हे बरोबर नाही. तुमच्याकडे बहुमत आहे, म्हणून तुम्ही हा प्रस्ताव आणता आहात. एकदोघांचे शब्द चांगले नाहीत हे खरे आहे. ते रेकॉर्डवर आले पाहिजे, कारण त्याच वेळी तुमची माफी मागितलेली आहे. मात्र त्याकरीता ठरवून विरोधकांची संख्या कमी करीत असाल, तर हे बरोबर नाही. केवळ अध्यक्ष म्हणूनच नाही, तर भास्करराव जाधव म्हणूनही तुमचा सन्मान आहे. यासंदर्भात मोठ्या मनाने विरोधकांशी चर्चा केली पाहिजे, त्यानंतर कारवाई करायची असेल तर तुम्ही करू शकता. पण जर कोणी वासरू मारत असेल तर गाई मारली जात असेल तर हे बरोबर नाही. मी स्वतः भांडण होऊ दिले नाही.